उत्तर प्रदेश : समर्थ रामदास आणि छत्रपती शिवराय (Chatrapati Shivaji Maharaj) यांचं नातं सांगण्याच्या प्रयत्नात भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद गाजला होता. त्याचे राजकीय पडसादही उमटले होते. दरम्यान, यानंतर आता शिवराय आणि समर्थ रामदास यांचीत भाषा भाजप खासदार बृजभूषण सिंग (Brujbhushan Singh on Raj Thackeray) यांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा जुना वाद नव्यानं पेटण्याची चिन्ह आहेत. राज ठाकरेंविरोधात काढण्यात आलेल्या भव्य रॅली दरम्यान, बृजभूषण सिंह बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी समर्थ रामदास स्वामी नसते, तर छत्रपती शिवाजी महाराजही नसते, असा उल्लेख केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंविरोधात बृजभूषण सिंह आक्रमक झालेत. मात्र, आता त्यांनी केलेल्या विधानानं नवा वाद छेडला जाण्याची शक्यता आहे.
द्रोणाचार्य होते तो, अर्जून ना होते, परशूराम ना होते, तो द्रोणाचार्य ना होते, संत रामदास ना होते तो शिवाजी ना होते, असं विधान भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केलंय.
औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनीही असंच विधान केलं होतं. 27 मार्च रोजी त्यांनी केलेल्या विधानानं मोठा गदारोळ झाला होता.
तुम्ही यूपीच्या गरोदर महिलांना मारलं, परिक्षा देणाऱ्या पोरांना पळवून लावलं, तुम्हाला विनाशर्त माफी मागावीच लागेल, तर तुम्ही अयोध्येत पाऊल ठेऊ शकता, असं म्हणत बृजभूषण सिंहांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. मी खासदार, माझी बायको खासदार, गोंडाच्या जनतेने मला खूप दिलंय, मला वाटतं की, राज ठाकरेनी माफी मागावी, राज ठाकरेजवळ एक संधी आहे, त्यांनी उत्तर भारतीयांची माफी नाही मागितली तरी चालेल, पण अयोध्येच्या संतांची माफी मागावी. इतकंही करता येत नसेल, तर यूपी, झारखंड, बिहारमध्ये तुम्ही कधीही पाऊल ठेऊ शकणार नाही, जेव्हापण तुम्ही पाऊल ठेवाल, तेव्हा तुम्हाला तुमचं पाप आठवेल, असा इशारा बृजभूषण सिंहांनी दिलाय.
माझा विरोध महाराष्ट्रशी नाही, माझा विरोध राज ठाकरेंना आहे, ज्यांनी महिलांना, पोरांना, मजुरांना मारलं, हे महाराष्ट्राच्या बाहेर नाही निघत. पहिल्यांदा ते महाराष्ट्राबाहेर येत आहेत. आम्ही तर 2008 पासूनच त्यांच्या येण्याची वाट पाहतोय, असंही भाजप खासदारानं म्हटलंय.