सोलापूर: भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारकांवर सडकून टीका केली आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. इतकंच नाही तर भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशावरच आक्षेप घेतला आहे. राजन पाटील यांचे अनेक घोटाळे आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं धक्कादायक विधान धनंजय महाडिक यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्याच विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित राहिला आहे.
राजन पाटील भाजपत येण्यात उत्सुक आहेत. कारण त्यांचे अनेक घोटाळे आहेत. नक्षत्र दारू निर्मिती कारखान्यामध्ये त्यांनी 25 कोटी रुपयांचा कर चुकवलेला आहे. त्या प्रकरणात त्यांचे संपूर्ण कुटुंबीय जामिनावरबाहेर आहे. त्यांना आत जाऊन बसावे लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन आपल्याला संरक्षण मिळेल असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे. त्यामुळे अशा मनोरुग्ण प्रवृत्तीला प्रवेश मिळेल असे वाटत नाही, असं धनंजय महाडिक म्हणाले.
राजन पाटील यांच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन या निमित्ताने लोकांना झाले. प्रशांत परिचारकांनी सीमेवरील जवानांच्या कुटुंबीयांबाबत जे नीच वृत्तीचे वक्तव्य केले होते त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील.
शरद पवार यांच्या पक्षाचे हे लोक आहेत. त्यांचा पक्ष विचारावर, विकासावर चालणारा आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाने अशा लोकांबाबत निर्णय घ्यायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत आम्ही दूरदृष्टी ठेवली. कारखान्याचा विकास आणि शेतकऱ्यांची प्रगती हे ध्येय ठेवल्याने दहा वर्षापासून शेतकऱ्यांनी आम्हाला सत्तेत ठेवले.
पहिल्या निवडणुकीत अडिच हजार मतांनी, दुसऱ्या निवडणुकीमध्ये पाच हजार मतांनी आम्ही विजयी झालो. आता यंदाच्या वर्षी विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास आहे, असं ते म्हणाले.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पाडावी असे आवाहन मी केले होते. मात्र विकृत मनोवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांवर ही निवडणूक लादली. राजन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.