अहमदनगर : लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागल्यापासून महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता नव्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, त्यांना दक्षिण नगरमधून भाजपकडून उमेदवारीही जाहीर झाली. त्यामुळे याच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे मात्र नाराज झाले आहेत. केवळ नाराज नव्हे, तर दिलीप गांधी हे बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार दिलीप गांधी यांनी बंड केल्यास, भाजपला आणि पर्यायाने सुजय विखे यांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे.
अहमदनगरमध्ये आज बैठकांचा सिलसिला सुरु राहणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांची आज बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये दिलीप गांधी यांची राजकीय वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सुजय विखे आणि भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दिलीप गांधी यांनी बंडखोरी केल्यास, अहमदनगरमध्ये भाजपला दणका बसेलच, त्याचसोबत नुकतेच भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटलांना जोरदरा झटका बसेल.
दुसरीकडे, अहमदनगरमध्येच काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसची, तर मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होणार आहे. एकंदरीत नगरमध्ये आज राजकीय वातावरण प्रचंड हालचालीचं असेल.
दिलीप गांधी यांचं तिकीट भाजपने कापलं!
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघ राजभर चर्चेत आला आहे. भाजपचे दिलीप गांधी हे विद्यमान खासदार आहेत. गेल्या तीन टर्मपासासून ते खासदार आहेत. गेल्या वेळी ते मोदी लाटेवर स्वार झाले. मात्र यंदा त्यांच्या नौकेला आनेक आडथळ्यांना सामोरं जावं लागलं आणि अखेर त्यांचा पत्ताच कट झाला. सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, त्यांना उमेदवारीही जाहीर झाली आणि पर्यायाने दिलीप गांधी यांना बाजूला सारण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे.
सुजय विखेंच्या अडचणी वाढल्या!
सुजय विखेंनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करुन तिकीट मिळवल्याने स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. त्यात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी बंड केल्यास सुजय विखेंना जबर फटका बसेल. शिवाय, दुसरीकडे आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना तिकीट मिळाल्याने, सुजय विखेंना तोडीस तोड विरोधी उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे आधीच सुजय विखेंचा विजय आव्हानात्मक बनला असताना, त्यात दिलीप गांधी यांनी बंड केल्यास, सुजय विखे यांच्या अडचणी दुपटीने वाढतील, हे निश्चित.