सोलापूर : भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी दोन दिवसांपूर्वी सिंचन घोटाळा प्रकरणात एकापाठोपाठ सलग पाच ट्विट केले होते. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. आता या सर्व प्रकरणावर माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेच असल्याचे मानले जात होते. मात्र मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्या नेत्याबाबत हे ट्विट केले आहे, तो नेता अजित पवार नसून दुसराच असल्याचा गौप्यस्फोट निंबाळकर यांनी केला आहे. लवकर ही माहिती समोर येईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बडा नेता कोण असावा असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच बडे नेते ईडीच्या रडारवर आहेत. मात्र आताच त्या 5 जणांची नावे सांगणे गोपनीयतेचा भंग होईल. येत्या काळात ती नावे सर्वांसमोर येतीलच. मोहित कंबोज यांनी काही ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. तसेच राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असे म्हटले होते. मात्र मोहित कंबोज यांचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे नसून तो पक्षातील दुसराच नेता आहे, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर पाचवा नेता कोण असा प्रश्न त्यांना विचारला असता ते आपल्याला लवकरच कळेल असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
सध्या शिंदे गट आणि शिवसेनेचा न्यायालयात वाद सुरू आहे. शिवसेनेने सुप्रीम कोर्टात शिंदे गटाविरूद्ध विविध याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणावर देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच मिळणार आहे. शिंदे गटाचा विजय निश्चित आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटालाच मिळेल असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.