मुंबई: 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ सुरु असल्यामुळे जळगाव मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदाराला डावलून नव्या नेत्याला उमेदवारी देण्याचा राजकीय जुगार खेळला होता. सुरुवातीला भाजपकडून तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने स्मिता वाघ यांचा पत्ता कापत उन्मेष पाटील यांना रिंगणात उतरवले होते. अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर होऊनही उन्मेष पाटील यांनी तब्बल चार लाख मतांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांना धूळ चारली होती.
उन्मेष पाटील यांचा जन्म 24 जून 1978 रोजी झाला. साखर कारखान्याच्या आंदोलनातून उन्मेष पाटील यांचे नेतृत्त्व आकाराला आले. उन्मेष पाटील यांचे वडील भैयासाहेब पाटील हे बेलगंगा साखर कारखान्यात लेखापाल होते. चाळीसगावमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1994 मध्ये त्यांनी प्रवरानगरहून पॉलिटेक्निक तर 1997 मध्ये जळगावातून केमिकल इंजिनिअरिंगचे (B.E.) शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात चांगली गती असलेल्या उन्मेष पाटील यांनी पुढे जाऊन ई कॉमर्स संबंधी शिक्षण घेतले होते. राजकारणात येण्यापूर्वी उन्मेष पाटील यांनी मराठीतून हिशेब व मोजणीसाठी ‘ई मुनिमजी’ हे सॉफ्टवेअर तयार केले होते.
चाळीसगाव तालुक्यातील बंद पडलेला बेलगंगा साखर कारखाना सुरु छेडलेल्या आंदोलनातून उन्मेष पाटील यांच्या राजकीय जीवनाचा पाया रचला गेला. हा कारखाना सुरु करण्यासाठी उन्मेष पाटील यांनी शेतकरी आणि स्थानिक तरुणांना घेऊन थेट जिल्हा बँकेवर मोर्चा काढला होता.
बेलगंगा साखर कारखाना सुरु करण्यासाठीच्या आंदोलनामुळे उन्मेष पाटील प्रकाशझोतात आले होते. भाजपमध्ये लहान वयातच त्यांना अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मिळाल्या. ते काही काळा भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीसही राहिले आहेत. 2014 मध्ये भाजपने त्यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले. या निवडणुकीत त्यांनी 22 हजारांच्या मताधिक्याने विजय संपादन केला.
तर 2019 मध्ये भाजपने तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर स्मिता वाघ यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर स्थानिक कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला होता. त्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उन्मेष पाटील यांचे नाव जाहीर केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने देवकर उन्मेष पाटील यांच्यापेक्षा प्रचारात खूप पुढे निघून गेले होते. तरीही उन्मेष पाटील यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवून दिला.