अहमदनगर : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. नगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. त्यानंतर आज स्वत: सुजय विखे पाटील यांनी दिलीप गांधींची भेट घेतली. त्यामुळे दक्षिण नगरमधील राजकीय वर्तुळात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.
डॉ. सुजय विखे पाटील आणि दिलीप गांधी यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. सदिच्छा भेट असल्याचे सुजय विखे पाटलांनी या भेटीनंतर सांगितले असले, तरी दिलीप गांधींची नाराजी दूर करण्यात विखे पाटील पिता-पुत्राला यश आल्याची चर्चा आहे.
दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी नगर दक्षिणमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, आधी राधाकृष्ण विखे पाटील आणि आता सुजय विखे पाटील यांच्या भेटीगाठीनंतर सुवेंद्र गांधी आपली घोषणा मागे घेण्याची शक्यता असून, ते तलवार म्यान करण्याच्या तयारीत आहेत, अशीही चर्चा आहे. शिवाय, दिलीप गांधी हे सुजय विखेंचा प्रचार करताना दिसू शकतात.
काल राधाकृष्ण विखे पाटील-दिलीप गांधी भेट
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालच खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीने नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
कालच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले होते?
बरेच दिवस भेटलो नव्हतो म्हणून ही सदिच्छा भेट असल्याचे विखे पाटलांनी सांगितलाय. तर हे घर माझंच असून आमचा जुना स्नेह असल्याचे विखे म्हणाले. तसेच राजकारणची चर्चा झाली नसल्याचा दावा विखेंनी केला. मी राष्ट्रवादीचे काम करणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या काँग्रेसमध्येच असले तरी आपण आघाडीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीने काँग्रेसला नगरची जागा न सोडल्याने सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी दिली आहे.
संबंधित बातम्या :
आहेर नको, सुजयला मत द्या, नगरमधील शेख कुटुंबाचं लग्नपत्रिकेतून आवाहन
राधाकृष्ण विखे पाटील खासदार दिलीप गांधींच्या भेटीला
नातं मध्ये येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विजय : शिवाजी कर्डिले