भाजपाची मातृसंघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जातं. भाजपा आणि संघात अतूट नात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपामधून राजकारणात सक्रीय झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संघाचे प्रचारक होते. बदलता काळ, वेळ यानुसार संघ आणि भाजपामध्ये बरेच बदल झाले आहेत. संघ आणि भाजपाच्या या नात्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण, मत नोंदवलय. यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावू शकतात. “भाजपाला एकवेळ RSS ची गरज होती. पण पक्षाने आज आपला विस्तार केलाय. भाजपा आज स्वत:चा कारभार करण्यासाठी सक्षम आहे. आरएसएस एक वैचारिक आघाडी असून ते त्यांचं काम करतात” असं जे.पी.नड्डा म्हणाले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आतापर्यंत RSS ची उपस्थिती कशी बदललीय? या प्रश्नावर जे.पी.नड्डा यांनी हे उत्तर दिलं. “सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू. आरएसएसची गरज लागायची. आज आम्ही वाढलोय. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपाच स्वत:ला चालवते. हा फरक आहे” असं उत्तर जे.पी.नड्डा यांनी दिलं. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला ही मुलाखत दिलीय.
भाजपाला आता आरएसएसच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही का?
भाजपाला आता आरएसएसच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही का? या प्रश्नावर नड्डा म्हणाले की, “आता पक्ष विस्तारलाय. प्रत्येकाला त्यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या आहेत. आरएसएस एक सांस्कृती, सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय पक्ष आहोत” “हा गरज असण्याचा विषय नाहीय. ते एक वैचारिक फ्रंट आहे. ते वैचारिक दृष्ट्या आपल काम करतात. आम्ही आपलं. आम्ही आमच्या पद्धतीने आमचा कारभार चालवतो. राजकीय पक्षांनी तसच केलं पाहिजे” असं जे.पी.नड्डा म्हणाले. जे.पी.नड्डा या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाच अजेंडा ते दक्षिणेतील पक्षाची घोडदौड या विषयांवर सुद्धा बोलले आहेत. मथुरा, काशी येथे वाद असलेल्या ठिकाणी मंदिर उभारणीची कोणतीही योजना नाही असं जेपी नड्डा यांनी स्पष्ट केलं.