नवी मुंबई : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्यामुळे त्यांना डावलल्या जात असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. याच भावनेपोटी मुंडे भगिनी समर्थक राजीनामे देत आहेत. अजूनही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून भाजपचे पदाधिकारी आपल्या वरिष्ठांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवत आहेत. आता नवी मुंबईतील भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. आदिनाथ डमाळे यांच्या राजीनाम्यानंतर नवी मुंबई तसेच मुंबई उपनगरात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. (BJP nomadic Vimukta Aghadi Maharashtra general secretary also resigns in support of Pritam Munde and Pankaja Munde)
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्राच्या चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, या चार नेत्यांमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आले नाही. याच कारणामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे समर्थक नाराज आहेत. मुंडे भगिनींना डावलले जात असल्याची भावना या समर्थकांमध्ये आहे. याच नाराजीतून अहमदनगर तसेच बीड जिल्ह्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. बीडमध्ये तर भाजपच्या सर्वच तालुकाध्यक्षांनी आपल्या वरिष्ठांकडे सामूहिक राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर आता भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखी राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, सध्याच्या राजीमानासत्र आणि मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. यावेळी ही भेट झाली.
इतर बातम्या :
शेलार म्हणाले राज्य सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी केलं, आता जयंत पाटलांचा पलवटवार, म्हणाले…
“शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”
(BJP nomadic Vimukta Aghadi Maharashtra general secretary also resigns in support of Pritam Munde and Pankaja Munde)