नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने अमित शाह यांना 16 जानेवारी रोजी तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
16 जानेवारी रोजी अमित शाह यांना अचानक ताप आला आणि ताप वाढत गेला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यानुसार एम्समध्ये दाखल करुन, त्यांच्या डॉ. गुलेरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले
स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती अमित शाह यांनी स्वत:च ट्विटरवरुन दिली होते. त्यांनी म्हटले होते की, “मला स्वाईन फ्ल्यू झालं आहे. सध्या उपचार सुरु आहेत. ईश्वरच्या कृपेने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने आणि शुभेच्छांमुळे लवकरच बरा होईन.”
लोकांचा शाप लागल्यामुळे अमित शाहांना स्वाईन फ्लू : काँग्रेस खासदार
कर्नाटकमध्ये आणखी हस्तक्षेप केला तर त्यांची (अमित शाह) प्रकृती आणखी खराब होईल. कर्नाटक सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना लोकांचा शाप लागलाय. आमच्या अध्यक्षांबाबतही ते चुकीचं बोलतात, असं वक्तव्य हरीप्रसाद यांनी केलं होतं. हरीप्रसाद हे काँग्रेसकडून राज्यसभा उपसभापतीच्या निवडणुकीत उमेदवार होते.