मुंबई | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजूनही सुरु आहे. पण कोणत्या राज्यात कुणाची सत्ता येणार हे चित्र स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांच्या निवडणुकीला जास्त महत्त्व होतं. कारण पुढच्या तीन महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक लोकसभा निवडणुकीआधीची सेमीफायनल मानली जात होती. या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठं यश मिळताना दिसत आहे. चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. विशेष म्हणजे छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसच्या हातातील सत्ता निवडणुकीच्या माध्यामातून हिसकावली आहे. तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम ठेवण्यात भाजपला यश आलं आहे.
काँग्रेसला एका राज्यात यश मिळालं आहे. तेलंगणात काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे. पण चार राज्यांच्या एकूण निकालाचा विचार केला तर भाजपचं पारडं जड आहे. याशिवाय आता देशात भाजपची ताकद वाढली आहे. या विजयानंतर भाजपची आता देशात कोणकोणत्या राज्यांमध्ये सत्ता आहे, या विषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
देशातील 28 राज्य आणि विधानसभा असलेल्या 2 केंद्रशासित प्रदेश यांच्यापैकी एकूण 16 राज्यांमध्ये भाजप आणि भाजपप्रणित एनडीएचं सरकार आहे. विशेष म्हणजे आता 12 अशी राज्य आहेत ज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. या निवडणुकीआधी काँग्रेसची 7 राज्यांमध्ये सत्ता होती. पण आता केवळ 6 राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचं सरकार शिल्लक असणार आहे. या व्यतिरिक्त 8 असे राज्य आहेत जिथे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची सत्ता नाही. पण त्या राज्यांमधील काही सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत.
भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजप बहुमताने असलेल्या राज्यांची संख्या 11 वर आली आहे. या 11 राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त देशातील 5 राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएचं सरकार आहे. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, मेघालय, सिक्किम, नागालँड यांचा समावेश आहे. त्यामुळे 30 पैकी 16 विधानसभा राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. ज्या राज्यांमध्ये एनडीएची सत्ता आहे, त्यापैकी हरियाणामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आहेत. मेघायलायत एनपीपीचे कोनाड संगना, सिक्किममध्ये सिक्किम क्रांतिकारी मोर्चाचे प्रेम सिंह तमांग, नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेफ्यू रियो मुख्यमंत्री आहेत.