मुंबई : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रवक्ते अवधूत वाघ पुन्हा बरळले आहेत. यावेळी अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ‘लावारीस’ असे म्हटले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मुलांची अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी थट्टा केली आहे. त्यामुळे अवधूत वाघ यांच्यावर आता सोशल मीडियासह सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे.
ट्विटरवर ‘चौकीदार अवधूत वाघ’ या नावाने भाजपचा महाराष्ट्रातील प्रवक्ते असलेल्या अवधूत वाघ यांनी शेतकऱ्यांच्या मुलांची थट्टा केली आहे. याआधाही अवधूत वाघने अशी बेताल वक्तव्य केली आहेत. शिवाय, ट्विटरवर अवधूत वाघ कायमच वादग्रस्त ट्वीट करत असतो. यावेळी मात्र अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीच खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले भाजप प्रवक्ते अवधूत वाघ?
पत्रकार आणि शेतकरी पुत्रांना ट्रोल करणाऱ्यांना मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन इशारा देण्यात आला होता. त्या ट्वीटला उत्तर देताना भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अर्वाच्य भाषा वापरुन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान केला.”आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा.”, असा रिप्लाय भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी दिला.
याआधीही अवधूत वाघ अशाच बेताल वक्तव्यामुळे प्रसिद्धीस आले होते. मोदी हे विष्णूचे अवतार आहेत, असेही भाजप प्रवक्ते अवधूत वाघ म्हणाले होते.
एकंदरीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य सुरु केले आहे. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साला’ म्हटले होते, तर भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच, भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्याची भाषा केली होती. त्यामुळे भाजपच्या गोटातील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत आता भाजप प्रवक्ता अवधूत वाघही बसले आहेत.
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…
हागणारा नाही तर बघणारा लाजातो https://t.co/XHOP9TIp9A— चौकीदार Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) March 28, 2019