मुंबई : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सविस्तर वृत्तांत मीडियाला सांगितला. ही केवळ सदिच्छा भेट होती, यामध्ये अर्थातच राजकीय चर्चा झाली. पण भाजप आणि मनसे युतीबाबत असा कोणताही प्रस्ताव सध्यातरी नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर परप्रांतियांचा मुद्दा आणि हिंदुत्व या दोन विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली. यावेळी राज यांनी कोविडच्या दीड वर्षात माझी भूमिका मी जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आता कोविड कमी झाला. मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण अन्य प्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असं राज यांनी सांगितलं” अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही भाष्य केलं. “येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत खासदार असलेल्या संजय राऊतांनी मुंबईतील सेफ जागा शोधावी आणि तिथून निवडणूक लढवावी. अमेरिकेची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायला सज्ज आहोत अशा थाटात राऊत दंड थोपटतात. त्यांनी दंडही चेक करावे आणि त्यांची क्षमताही चेक करावी”, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर ही भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती की या दोन बड्या नेत्यांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली? राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरुनच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील सांगितला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. या भेटीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. त्यामुळे राज-पाटील भेटीत युतीवरच अधिक चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संबंधित बातम्या:
राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!
राज ठाकरेंबद्दल तेव्हापासूनच अट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही… : चंद्रकांत पाटील