राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज सुनेत्रा पवार यांनी राज्य सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी महायुतीमधून शिवसेना आणि भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. आज यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. महायुती मधून त्यांना सगळ्यांच समर्थन आहे. मात्र महायुतींमधून हा नाही गेला, तो नाही गेला, याला काही अर्थ नाही” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण काय बोलले? हे मला अजिबात माहिती नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची मनसेने पूर्ण तयारी केली होती. पण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरुन मनसेने अखेरच्या क्षणी माघार घेतली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे बोलले आहेत. “राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता . इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे. चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल” असं पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
‘अजित पवारांना घेऊन भाजपच कोणतही नुकसान नाही’
“मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचे शीष्टमंडळ गेल आहे, त्यातून मार्ग निघेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “अजित पवारांना घेऊन भाजपच कोणतही नुकसान नाही. उलट 2019 च्या तुलनेत भाजपची मतं वाढली. मात्र जागा कमी झाल्या हे सत्य आहे” असं बावनकुळे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र जिंकलेल्या जागा असतील, तिथे ईव्हीएम वर संशय का घेत नाहीत? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.