मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला. पण या निवडणुकीत संजय पवार यांना पाडण्याचा भाजपचा प्लानच नव्हता. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनाच पाडण्याचा प्लान होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. खुद्द संजय राऊत (sanjay raut) यांनीही तसं विधान केलं आहे. मलाही निवडणुकीत पाडायचा डाव होता. पण ते शक्य होऊ शकलं नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कालच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी या निवडणुकीत एक संजय पडणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर रात्री उमेदवारांचा विजय झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी राऊतांपेक्षाही धनंजय महाडिक यांना सर्वाधिक मते पडल्याचा दावा केला. भाजप नेत्यांच्या या विधानानंतर राऊतांचं सूचक विधान आलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत राऊत हेच भाजपचं मुख्य टार्गेट होते की काय? असा संशय व्यक्त केला जात आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मी फक्त माझ्यासाठी पक्षाने दिलेल्या 42 मतांवरच लढत होतो. त्यातील त्यांनी एक मत बाद करण्याचा प्रयत्न केला. मीही एकही जास्त मत घेतलं नाही. कारण आमच्यातही अटीतटीची लढत होती. मी काही 48-50 अशी मते घेतली नाहीत. मी फक्त 42 मतांवर लढलो आणि जिंकलो, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ज्या कारणासाठी माझं एक मत बाद केलं. अशाच प्रकारचा काही मतांवर आक्षेप आम्हीही घेतला होता. त्याचप्रकारची चूक समोरच्यांनी केली. पण त्यांची मते बाद झाली नाहीत. निवडणूक आयोगाने समोरच्यांची मते बाद केली नाही. त्यात सात तास गेले. कुणाला पडणारं मत बाद झालं हे शोधण्यात वेळ गेला. केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कशा काम करतात हे आम्ही डोळ्यांनी पाहतो. कुठे ईडी वापरलं जातं, कुठे सीबीआय वापरलं जातं. कुठे अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात का हा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.
सुहास कांदे यांचं मत का बाद केलं? हा संशोधनाचा विषय आहे. कांदे याचं मत ज्या कारणासाठी बाद झालं. त्याच कारणासाठी आम्ही मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतला. अमरावतीच्या एका शहाण्याचं मत बाद व्हायला हवं होतं. ते झालं नाही. यांना पहाटेची फार सवय आहे पापकर्म करायची. त्यांचा पहाटेपर्यंत उपक्रम सुरू होता. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा घोडेबाजार करत राहा, अशी टीकाही त्यांनी केली.
आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही, याचा अर्थ असा नाही की कोणी तरी दैदिप्यमान विजय मिळवला. असं नाही. ठिक आहे. भाजपने एक जागा जिंकली. आम्हाला पहिल्या क्रमांकाची 33 मते मिळाली आहेत. 27 मते भाजपला मिळाली. तसे म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रिया वेगळी असते. पहिल्या पसंतीचे दुसऱ्या पसंतीचे मते पाहिली जातात, असं त्यांनी सांगितलं.