आतली बातमी! भाजपच्या अनेक आमदारांना धाकधूक, माजी खासदारांमुळे विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार?

| Updated on: Oct 17, 2024 | 10:17 PM

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या येण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी भाजपने आणखी मायक्रो प्लॅनिंग केल्याची माहिती आहे. निवडून येण्याच्या क्षमतेत जे आमदार बसणार नाहीत, त्यांचा पत्ता कट होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोणाची नावं चर्चेत आहेत ते जाणून घेऊयात.

आतली बातमी! भाजपच्या अनेक आमदारांना धाकधूक, माजी खासदारांमुळे विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार?
Follow us on

भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली आणि या बैठकीत 110 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे काही तासांत भाजपची पहिली यादी येईल. रविवारपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप 160 किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55-60 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 73-75 जागा मिळू शकतात. तिकीट देताना भाजपचं मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे. भाजपनं 2-3 सर्व्हे केले आहेत. त्यासोबतच, काही जुन्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचं भाजपनं ठरवल्याची माहिती आहे. तसेच काही आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

घाटकोपर पश्चिममध्ये राम कदमांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. लोकसभेत विद्यमान खासदार असताना तिकीट कापलेले मनोज कोटक यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत राम कदमांच्या मतदारसंघात मिहीर कोटेचा 15 हजार 700 मतांनी पिछाडीवर राहिले. पंतप्रधान मोदींनी रोड शो करुनही लोकसभेत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे राम कदमांचा पत्ता कट होऊ शकतो.

आणखी कुणाकुणाची तिकीट कापलं जाण्याची शक्यता?

घाटकोपर पूर्वमध्ये पराग शाह यांच्याजागी प्रकाश मेहतांना तिकीट देवून पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये प्रकाश मेहतांचं तिकीट कापलं होतं, आणि नुकत्याच झालेल्या मेळाव्यात लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्यापेक्षा भाजपनेच पुनर्वसन करण्याचं ठरवलंय.

वर्सोव्यात भारती लव्हेकरांऐवजी संजय पांडे यांच्या नावाला पसंती आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकरांना 21 हजारांची आघाडी आहे. तसंच मतांचं समीकरण पाहता भाजपनं फडणवीसांच्या जवळचे अशी ओळख असलेल्या संजय पांडेंना तिकीट देण्याचं ठरवल्याचं कळतंय.

सायनमध्ये तमीळ सेल्वन यांच्या ऐवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत सेल्वन यांच्या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई 9 हजार 300 मतांची आघाडी आहे. त्यामुळे सेल्वन यांचा तिकीट कापण्याचं ठरवल्याचं दिसतंय.

बोरिवलीत सुनिल राणेंच्या जागी गोपाळ शेट्टींच्या नावाची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचं तिकीट कापलं होतं. त्यांच्याऐवजी पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. उत्तर मुंबई ही भाजपची मुंबईतून विजयी झालेली एकमेव जागा आहे. त्यामुळे नाराज गोपाळ शेट्टींचं पुनर्वसन विधानसभेत केलं जावू शकते.

2019 मध्येही दिग्गजांची तिकीटं कापली

2019 मध्येही भाजपनं दिग्गजांची तिकीटं कापून धक्का दिला होता. चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहतांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळं याही वेळी काही आमदारांना पुन्हा संधी देण्याऐवजी नव्यांना किंवा पुनवर्सनाच्या लिस्टमधल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. योग्य उमेदवाराला तिकीट मिळेल असं शेलार सूचकपणे बोलले आहेत. त्यामुळे कोणाचं तिकीट कट होणार? हे पुढच्या काही तासांत पहिल्या यादीतून दिसेल.