“आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे. दरवेळेप्रमाणे याही वेळेला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. खरंतर देशातील 50 टक्के महिलांनी रोज बाबासाहेबांना वंदन केलं पाहिजे, असं माझ म्हणणं आहे. कारण जगातली ही अशी पहिली डेमोक्रसी आहे, ज्यात अगदी पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. त्यामुळे या देशातील 50 टक्के महिला मुख्य प्रवाहात आल्या. अन्यथा महिला चूल, मुलच्या पलीकडे गेल्या नसत्या, हे त्रिवार सत्य आहे” असं भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.
“आज या ठिकाणी आलो. बाबासाहेबांना नमन, वंदन केलं. बाबासाहेबांनी आमच्यासाठी प्रगतीच जे द्वार उघड करुन दिलय, त्यावरती चालत शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिच्या आयुष्यात आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या. मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लागण्याची शक्यता आहे, त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, “आमचा सगळया लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री पदी असावा असा अट्टहास, अशी इच्छा होती. ती पूर्ण झालीय. येणाऱ्या दिवसात त्यांच्या सेनापतीच मंडळ दिसेल. मी असेन किंवा नसेन त्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही”
मंत्रिमंडळात महिलांच्या समावेशावर काय म्हणाल्या?
“भाजपकडे तीन-चार टर्मच्या महिला आमदार आहेत. आज सगळ्यात जास्त महिला आमदार भाजपच्या आहेत. मागच्या टर्ममध्येही भाजपच्या महिला आमदाराची संख्या जास्त होती. येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी मंत्रिमंडळात दिसतील” असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. खातेवाटपावर महायुतीत एकवाक्यात दिसत नाही, एकनाथ शिंदे समाधानी दिसत नाहीत, या प्रश्नावरही चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं.
एकनाथ शिंदे अजूनही नाराज का?
“असं तुम्हाला वाटतय. अस काही नाहीय, तुम्ही जे दाखवताय ते सत्य नाहीय. कालचा शपथविधी तुम्ही पाहिला, खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडला. त्यानंतर काल पत्रकार परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यात एकनाथराव, अजितदादांच योगदान आहे. आता सूत्र आमचे लाडके भाऊ देवा भाऊंच्या हाती आहे. येणाऱ्या दिवसात या तिघांच्या मदतीने महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल हा मला विश्वास आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या. भाजपने एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती, असं दावा संजय राऊत यांनी केला. त्यावर “कुणाचं नाव, कुठे घेता. चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलेय, कुठे गटाराचं नाव घेता” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी समाचार घेतला.