मुंबई : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक (BJP Working Committee Meet) आज पनवेलमध्ये पार पडली. त्यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे’, असं आवाहन पाटील यांनी केलं. पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्धाटन सत्रात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व विजया रहाटकर, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आ. आशिष शेलार व्यासपीठावर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपाने राज्यात विविध निवडणुका जिंकल्या व जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला. आघाडी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण एकही कार्यकर्ता डगमगला नाही. कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदु्त्व संकटात आले. नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला.
सी. टी. रवी यांनी सांगितले की, राज्यातील राजकीय परिवर्तनामुळे केंद्र सरकारच्याच विचारांचे विकासाचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आगामी काळात कठोर परीश्रम करून संघटना आणखी मजबूत करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत.
प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी शोकप्रस्ताव मांडला. तर भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले.