मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील भाषणाने (Aurangabad) अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी” असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल 16 सप्टेंबरला केलेल्या वक्तव्यामुळे तर त्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. चंद्रकांत पाटलांनी पिंपरीतील एका कार्यक्रमात, मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसात पाहा, असं म्हटलं होतं.
मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं. कारण रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रुळ असतात, रुळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”
पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. सूत्रसंचालकाने दोन-तीनवेळा चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री असं संबोधलं. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत दिले.
संबंधित बातम्या
दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!