मुंबई: जेव्हा तुमच्याकडे मते कमी असतात तेव्हा काही राजकीय डावपेच टाकावे लागतात. अशावेळी राजकीय डावपेच टाकणाऱ्या बुजुर्ग नेत्यांचं ऐकलं पाहिजे. नेमकं तेच महाराष्ट्रात घडलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) जी चाल खेळायला गेले. त्या चालीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) संतप्त झाले. त्यांनी ती चाल खेळण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला (ncp) आपला प्लॅन बदलावा लागला. मात्र, पवार जी चाल चालू पाहात होते. त्याच चालीच्या आधारे भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणात विजय मिळवला आहे. महाराष्ट्रात धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर हरियाणात भाजपने अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांना विजयी केलं आहे. ती चाल म्हणजे दुसऱ्या पसंतीची मते. ही मते कशी ट्रान्स्फर करायची त्याचं हे गणित होतं. मात्र, जे पवारांच्या सर्वात आधी लक्षात आलं, ते मुख्यमंत्र्यांसहीत आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आलंच नाही. जेव्हा महाडिक जिंकले आणि गणितं मांडली गेली. तेव्हा ही चाल लक्षात आली. पण एव्हाना उशिर झाला होता.
राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची एक तांत्रिक गोष्ट असते. त्याचं गणित ठरलेलं असतं. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा वाढवून ती दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये कन्व्हर्ट केले जाते. त्यासाठी आधी ज्या उमेदवाराला सर्वात अधिक मते मिळतात त्याची अतिरिक्त मते लगेच दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला दिली जातात. हरियाणात भाजपने त्यांचे उमेदवार कृष्णपाल पंवार यांचं दुसऱ्या पसंतीचं मत कार्तिकेय यांना ट्रान्स्फर केलं. त्यामुळे कार्तिकेय यांचा विजय पक्का झाला अन् काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांचा पराभव झाला.
हरियाणा विधानसभेत राज्यसभा सदस्यांसाठी 90 मते होती. यावेळी एका अपक्ष आमदाराचं मत बाद करण्यात आलं. तसेच अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. म्हणजे दोन जागांसाठी 88 मते राहिली. यावेळी भाजपच्या पंवार यांना 31 मते मिळाली. माकन यांना 29 मते मिळाली. कार्तिकेय शर्मा यांना 28 मते मिळाली. फॉर्म्युल्यानुसार विजयासाठी कोणत्याही उमेदवाराला 29.34 मतांची आवश्यकता होती. पंवार यांना पहिल्या पसंतीची 31 मते मिळाली. त्यांची 1.66 मते उरली होती. ही मते नंतर शर्मा यांना ट्रान्स्फर केल्या गेली. कारण आमदारांच्या दुसऱ्या पसंतीची ही मते होती. त्यामुळे कार्तिकेय यांना 29.66 मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला.
काँग्रेसकडे 31 मते होती. ती माकन यांच्या विजयासाठी पुरेशी होती. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या कुलदीप बिश्नोई यांच्या क्रॉस व्होटिंगनंतरही माकन यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, काँग्रेसच्या एका आमदाराचं मत बाद ठरवल्या गेल्यामुळे माकन यांचं आणखी एक मत कमी झालं आणि शर्मा विजयी झाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्या पसंतीचा कोटा 44 मतांचा ठरवला होता. पहिल्या पसंतीच्या मतांमधील अतिरिक्त मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला जाईल, असं गणित पवारांनी मांडलं होतं. पण संपूर्णच्या संपूर्ण 44 मते राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला जाईल असं शिवसेनेला वाटलं. त्याला शिवसेनेने हरकत घेतली अन् नंतर हा कोटा 42 मतांचा करण्यात आला. तिथेच शिवसेनेच्या उमेदवाराचा घात झाला.
याउलट भाजपने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 48चा ठरवला. या मतांचं मूल्य होतं 4800. भाजपने ही मतं पीयूष गोयल यांच्या पारड्यात टाकली. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते गोयल यांच्याकडे असल्याने त्यांचीच मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे वर्ग करण्यात आली. महाडिकांना आवश्यक 4058 मते वजा केल्यावर शिल्लक मतांचं मूल्य 742 राहिलं. या मताला 48 ने भागल्यानंतर 15.45 मते उरली. ही 15.45 मते महाडिकांना मिळाली. त्याला गोयल यांच्या 48 मतांनी गुणल्यास मत मूल्य होते 720. हे 720 आणि बोंडे यांची 720 मत मूल्ये, तसेच महाडिक यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांचे मूल्य 2700 असे एकूण 4140 मत मूल्य (41.40 मते) घेऊन महाडिक विजयी झाले.
आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नव्हती. अगदी काठावरची मते होती. त्यात अपक्ष फोडले जाण्याची भीती होती. अशावेळी आघाडीने मतांचा कोटा ठरवायला हवा होता. पहिल्या पसंतीची मते आणि दुसऱ्या पसंतीची मते कशी टाकायची हे ठरवायला हवं होतं. शिवाय मतदानाचा पसंतीक्रम ठरवायला हवा होता. त्यासाठी जाणकार आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्यायला हवा होता. पण तसं झालं नाही. दगाफटका झाला तर काय करता येईल, याचा प्लान बी तयार ठेवायला हवा होता, तो त्यांनी ठेवला नाही. त्यामुळे आघाडीचं नुकसान झालं.