पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि तो उद्घाटन समारंभ वादग्रस्त ठरलेल्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला अंधश्रद्धेचा विळखा बसल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयाच्या गेटवर काळी बाहुली आणि कोहळा लावण्यात आला आहे. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह विज्ञानवाद्यांकडून आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटवर काळी बाहुली आणि कोहळा लावणं हे अंधश्रद्धेचं प्रतिक आहे. अंधश्रद्धेचा हा प्रकार घालवण्यासाठी अजून किती प्रयत्न करावे लागणार? असा सवाल अंनिसनं केलाय. राजकीय पक्षांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आहे. झालेली चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणीही अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलीय. (Black doll at the gate of NCP office in Pune, criticizes NCP on the issue of superstition)
दुसरीकडे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केलीय. ‘पुरोगामीपणाच्या उठता बसतां गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काळी बाहुली? गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचे’, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
पुरोगामीपणाच्या उठता बसतां गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काळी बाहुली? गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचे pic.twitter.com/VT4ArG9Lmy
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 30, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस अंधश्रद्धा पसरवत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकूण 22 ऑफिसेस आहेत. जागेच्या मालकानं काळी बाहुली आणि कोहळा लावला असेल तर आम्हाला माहिती नाही. याबाबत आम्ही जागेच्या मालकाला नक्कीच निरोप देऊ, अशी सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
‘बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’, पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप
पुण्यातील निर्बंधात सूट देण्याची चर्चा, एक-दोन दिवसात निर्णय होईल, गृहमंत्र्यांची माहिती
Black doll at the gate of NCP office in Pune, criticizes NCP on the issue of superstition