मुंबई: मुंबई महापालिका (bmc) निवडणुकीसाठी आज ओबसी आरक्षणाची (obc reservation) सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत शिवसेना (shivsena), शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील दिग्गजांना मोठा फटका बसला आहे. शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वॉर्डात ओबीसी आरक्षण पडलं आहे. त्यामुळे या मातब्बर नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डात जाऊन लढावं लागणार आहे. त्यातल्या त्यात विश्वनाथ महाडेश्वर यांना त्यांच्या वॉर्डातून त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना उभं करता येणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. तर मुंबईतील वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झाल्याने ओबीसी समाजामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज आरक्षण सोडत काढली. त्यात शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचा वॉर्ड क्रमांक 185 ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे उपनेते यशवंत जाधव यांचा वॉर्ड क्रमांक 217 ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते विश्वानाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्रमांक 96 ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. या मतदारसंघातून त्यांना त्यांची पत्नी पूजा महाडेश्वर यांना उतरवता येणार आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्डही ओबसी महिलांसाठी राखीव झाला आहे. तर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड 109 सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना अन्य मतदारसंघातून लढावे लागणार आहे.
महापालिकेच्या 236 पैकी 219 प्रभागांच्या आरक्षणाची आज लॉटरी काढण्यात आली. यातून एससी आणि एसटीचे मतदारसंघ वगळण्यात आले आहेत. या 219 पैकी 63 प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
3, 7, 9, 12, 13, 16, 17, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 61, 62, 73, 76, 79, 81, 82, 87, 89, 96, 98, 101, 110, 117, 127, 128, 129, 130, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 173, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236
दरम्यान, दिवाळीपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग पावसाचा अंदाज घेऊन या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.