मुंबई : “मी तूर डाळीचा घोटाळा ऐकला होता, पण कोरोना मृतांचा घोटाळा पहिल्यांदाच ऐकत आहे (Kishori Pednekar on Devendra Fadnavis). खरंतर मृत बॉडी लपून राहूच शकत नाही. ती तातडीने डिस्पोज करावी लागते. ज्यांना कुणाला राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवलं असं वाटत असेल त्यांनी सिद्ध करुन दाखवावं. हे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे”, असा घणाघात मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. याशिवाय “भाजपने महामारीत एकत्र काम करावं”, असा सल्ला पेडणेकर यांनी दिला (Kishori Pednekar on Devendra Fadnavis).
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवली, असं वाटत असेल तर त्यांनी सिद्ध करुन दाखवावं. कोरोना हा गंभीर आजार आहे. यादरम्यान राजकारण करु नका. महाराष्ट्रात सध्या खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खरे की खोटे? हे जनता ठरवेल”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“राज्य सरकारला कसं हरवता येईल, याकडे विरोधकांचा कल आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत जनाधार जरी मिळाला तरी तो अपूर्ण होता, हे त्यांनी मान्य करायला हवं. राज्याची आणि मुंबईची जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्योसोबत आहे. डॉक्टर, नर्सेस सगळे चांगलं काम करत आहेत”, असंदेखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले आहे. या पत्रात फडणवीस म्हणाले, “सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला, तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते.”
“आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणं नॉन-कोव्हिड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत”, असंदेखील फडणवीस पत्रात म्हणाले.
संबंधित बातमी :