अनुराधा पौडवाल यांचा मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक

| Updated on: Mar 16, 2024 | 2:10 PM

प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधीच मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्या लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

अनुराधा पौडवाल यांचा मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक
अनुराधा पौडवाल
Image Credit source: Instagram
Follow us on

नवी दिल्ली : 16 मार्च 2024 | बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज (शनिवार) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असंही कळतंय. त्या भाजपाच्या स्टार प्रचारक होऊ शकतात. अनुराधा या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी या भाषांमध्ये गायन केलंय. 1973 मध्ये ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांतील गाण्यांसोबतच त्या भजनांसाठीही विशेष ओळखल्या जातात.

‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘बेटा’ यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अनुराधा पौडवाल या गेल्या पाच दशकांपासून अधिक काळ गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलुगू, उडिया, आसामी, पंबाजी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिली यांसारख्या विविध भाषांमध्ये त्यांनी 9 हजारांहून अधिक गाणी दीड हजारांहून अधिक भजन रेकॉर्ड केले आहेत.

हे सुद्धा वाचा

पक्षप्रवेशानंतर अनुराधा म्हणाल्या, “मला या गोष्टीचा आनंद आहे की मी अशा सरकारमध्ये भाग घेतेय, ज्याचा सनातन धर्माशी दृढ नातं आहे. आज मी भाजपात प्रवेश करतेय, हे माझं सुदैव आहे.” आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्या पुढे म्हणाल्या, “मला त्याविषयी अद्याप काही माहीत नाही. वरिष्ठ नेतेमंडळी जे सांगतील ते मी करेन.”

जानेवारी महिन्यात उत्तरप्रदेशमधील अयोध्येत जेव्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, तेव्हा अनुराधा यांनी त्याठिकाणी भजन गायलं होतं. याआधी अनेक कार्यक्रमांमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुराधा पौडवाल यांचं सार्वजनिक मंचावर कौतुक केलं होतं. अनुराधा यांचं लग्न 1969 मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी झालं. ते एसडी बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार होते. 1991 मध्ये एका अपघातात अनुराधा यांच्या पतीनचं निधन झालं. त्यांना आदित्य हा मुलगा आणि कविता ही मुलगी आहे.