मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) 29 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, राज ठाकरे, बाला नांदगावकर, नितीन सरदेसाई, छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले संजय राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त झालेले दिसले होते. या लग्नसोहळ्यात त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसले होते.
बापासाठी लेकीचं लग्न म्हणजे ओठांवर हास्य ठेवून डोळ्यांच्या ओलावणाऱ्या कडा हळूच लपवण्याचा प्रसंग. तिच्या लहानपणापासूनच्या प्रत्येक आठवणीत हरवण्याचा क्षण. या सोहळ्यात संजय राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबीयही हास्य आणि आनंदाच्या अशाच सोनेरी क्षणात रंगून गेले आहे. दरम्यान लेकीसोबत खास फोटोसेशन करतानाचा संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
संजय राऊत आपल्या लेकीच्या लग्नाची तयारी करण्यात दंग झाले होते. आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची पूरेपर खबरदारी त्यांनी घेतली होती. प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास अन् प्रत्येक लेकीसाठी आपला बाप ‘किंग’च असतो. तिच्यासाठी तो एक पर्वताएवढा आधारही असतो. पण अशा कणखर पर्वतालासुद्धा हळवं मन असतं. बाप-लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आलीय.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात एका सामान्य वडिलांप्रमाणे सोहळ्याची लगबग सांभाळताना दिसले होते. संजय राऊत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग झाले होते. दरम्यान संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील हळव्या नात्याची झलक पाहायला मिळाली आहे.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह पार पडला आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.