Rajya Sabha Election : राज्यसभेत कुणाला पाठवायचं? महाडिक की पवार? ‘ते’ चार आमदार ठरवणार; एमएमआयचा कौल कुणाला?

| Updated on: Jun 03, 2022 | 6:36 PM

Rajya Sabha Election : राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. एक म्हणजे नवाब मलिक आणि दुसरे अनिल देशमुख. या दोन्ही आमदारांची मते आघाडीसाठी सर्वात महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करता यावे म्हणून राष्ट्रवादीचे नेते कोर्टात जाणार आहेत.

Rajya Sabha Election : राज्यसभेत कुणाला पाठवायचं? महाडिक की पवार? ते चार आमदार ठरवणार; एमएमआयचा कौल कुणाला?
राज्यसभेत कुणाला पाठवायचं? महाडिक की पवार? 'ते' चार आमदार ठरवणार; एमएमआयचा कौल कुणाला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेची निवडणूक  (Rajya Sabha election) बिनविरोध होणार नसल्याचं आज स्पष्ट झालं आहे. सर्वच उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक होणार आहे. मात्र, आघाडी (mahavikas agahdi) आणि भाजप (bjp) यांच्याकडे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठीची पुरेशी मते नाहीयेत. अपक्षांनी हात दाखवला तरच राज्यसभेवर कुणाचा तरी उमेदवार निवडून जाणार आहे. सर्व मदार अपक्षांवर असल्याने घोडेबाजार सुरू झाला असून अपक्षांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, असं असलं तरी आघाडीला चार आमदारांची चिंता अधिक भेडसावताना दिसत आहे. ते चार आमदार काय भूमिका घेतात त्यावर आघाडीच्या जय पराजयाचं गणित अवलंबून आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात

राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. एक म्हणजे नवाब मलिक आणि दुसरे अनिल देशमुख. या दोन्ही आमदारांची मते आघाडीसाठी सर्वात महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करता यावे म्हणून राष्ट्रवादीचे नेते कोर्टात जाणार आहेत. त्यामुळे कोर्ट या आमदारांना मतदान करण्याचा अधिकार देते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

एमआयएम काय करणार?

विधानसभेत एमआयएमचे दोन आमदार आहेत. हे आमदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत केली होती. शिवाय भाजपशी एमआयएमचं जमत नाही. तसेच आघाडीची राज्यात सत्ता आहे. त्यामुळे आघाडीच्या पारड्यात एमआयएम मते टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण कुणाच्या बाजूने?

महाविकास आघाडीच्या बाजूने बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, समाजवादी पार्टी आणि 8 आमदार आहेत. त्यामुळे आघाडीकडे 169 आमदार आहेत. तर भाजपसोबत राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य पार्टी आणि 5 अपक्ष असे भाजपकडे 113 आमदार आहेत.

29 आमदारांची मते गेम पलटवणार?

विधानसभेत काही छोट्या पक्षांचे मिळून 16 आमदार आहेत. तर 13 अपक्ष आमदार आहेत. म्हणजे एकूण 29 आमदार राज्यसभेवर कुणाला पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशी आहे जुळवाजुळव

पहिल्या पसंतीची मते दिल्यावर शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादीकडे 12, काँग्रेसकडे 2 आणि इतर आणि अपक्ष 16 मते उरतात. म्हणजे आघाडीकडे एकूण शिल्लक 43 मते शिल्लक राहतात. तर भाजपकडे 22 आणि सहयोगींचे 6 अशी 30 मते शिल्लक राहतात. गणितानुसार भाजपला आणखी 12 मतांची गरज असून आघाडीकडे तरी बहुमत दिसत आहे.

ही 29 मते महत्त्वाची

बहुजन विकास आघाडी: 3

एमआयएम: 2

प्रहार जनशक्ती पक्ष: 2

समाजवादी पार्टी: 2

मनसे: 1

राष्ट्रीय समाज पक्ष: 1

क्रांतीकारी शेतकरी पक्ष: 1

जनसुराज्य शक्ती: 1

शेतकरी कामगार पक्ष: 1

कम्युनिस्ट पक्ष: 1

स्वाभिमानी शेतकरी संघटना: 1