कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड (Shivsena corporator Mahesh Gaikwad) यांच्यावर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, महेश गायकवाड यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढेच नाही, तर महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) हे त्यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
कल्याण पूर्वचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रभागात एका खाजगी कंपनीचे खोदकाम करून केबल टाकण्याचे काम सूर आहे. बुधवारी (25 डिसेंबर) हे काम सुरु असताना महेश गायकवाड यांचे समर्थक याठिकाणी पोहचले आणि खोदकाम करणाऱ्या कामगारांना मारहाण केली. महेश गायकवाड यांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
महेश गायकवाड यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड हे त्यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या आरोपानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘गुन्हेगार काही पण बोलतो आहे. खंडणी मागणे हे चुकीचे आहे’, अस गणपत गायकवाड यांनी म्हटलं. या प्रकरणानंतर सेना आणि भाजपमधील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.