नागपूर : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्था असणारा देश आहे. या लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘कास्ट वॉर’ रंगलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नकली मागासवर्गीय आहे, असा आरोप मायावती यांनी केलाय, तर विरोधकांनी शिवी दिली म्हणून मला माझी जात माहीत झाल्याचं मोदींनी म्हटलंय. याच निमित्तानं जातीचा आधार घेऊन चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून हे ‘कास्ट वॉर’ रंगलंय.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील ‘कास्ट वॉर’ भारतातील सर्वात मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात रंगलं आहे. 80 लोकसभेच्या जागा असल्यानं उत्तर प्रदेश देशाचा प्रधानमंत्री ठरवतो, असं म्हटलं जातं. किंवा तशी गणितं स्वतंत्र भारतानंतर पाहायला सुद्धा मिळाली आहेत. याच उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात जातीचं राजकारणं केलं जातं. उत्तर प्रदेशात जातीय समीकरणं अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळेच यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी सपा-बसपा एकत्र आले आहेत.
चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावताना, जातीचे मुद्दे तापू लागले. “मुलायम सिंग खरे मागासवर्गीय असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नकली ओबीसी आहे”, असं वक्तव्य उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केलं.
मायावतींच्या या वक्तव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलंय. “जोपर्यंत विरोधक मला शिवी देत नाही, तोपर्यंत मला माझी जात माहित नव्हती, ते माझ्या मागासपणाची चर्चा करतात”, असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत मायावतींना दिलं. शिवाय, मी मागास नाही, तर अती मागास असल्याचंही मोदी म्हणाले.
देशाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय हा महत्त्वाचा आणि निर्णायक समाज घटक आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीतच नेत्यांना आपली जात आठवत असते. निवडणुकीत मतांसाठी अनेक नेते मागास असल्याचा दावा करतात. यंदाची सतरावी लोकसभा निवडणूकही यासाठी अपवाद नाही. पण या जातीच्या युद्धात विकास, रोजगार, शिक्षण सुविधा आणि यांसारख्या आवश्यक बाबी बाजूल्या सारल्या जातात.