मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज (26 डिसेंबर) प्रदर्शित केला जाणार आहे. मुंबईतील आयनॉक्स थिएटरमध्ये दुपारी दोन वाजता हिंदी ट्रेलर आणि दुपारी चार वाजता मराठी ट्रेलर प्रदर्शित केला जाईल. मात्र, त्याआधीच सिनेमाला एका अडचणीला सामोरं जावं लागत आहे. ‘ठाकरे’ सिनेमातील दोन संवाद आणि तीन दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप असला, तरी ट्रेलर प्रदर्शित होणारच, असा दावा सिनेमाचे निर्माते आणि शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, ट्रेलरमधील आक्षेपासंदर्भात सेन्सॉर बोर्डाशी चर्चा सुरु असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.
‘ठाकरे’ सिनेमातील नेमक्या कोणत्या दृश्यावर आणि संवादावर आक्षेप आहेत?
ठाकरे या आगामी सिनेमात बाबरी मशीद प्रकरणानंतरची दंगलीचा संदर्भ आहे. यावेळी ‘आडा गुडू’ हे शब्द वापरले आहेत. तसेच, सिनेमातील एकूण तीन दृश्य आणि काही संवादांवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, हे दृश्य किंवा संवाद आपण सिनेमातून काढणार नाही, अशी भूमिका सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि संजय राऊत यांच्यात जुंपण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारीत ‘ठाकरे’ या सिनेमाची जोरदार तयारी सुरु झालीय. फक्त निर्मातेच नव्हे तर प्रेक्षक आणि सेलिब्रिटीज अशा सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचलाय. क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय.
मी जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायचो, तेव्हा बाळासाहेब सांगायचे, देशाला गौरव वाटेल असाच खेळ कर. मी त्यांचे हे शब्द आशीर्वादाप्रमाणेच मानायचो आणि तसा खेळ करायचा प्रयत्न करायचो – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
येत्या 25 जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाचा परिणाम आगामी निवडणुकीवर तर नाही ना पडणार? राजकीय, क्रीडा, कला, अशा अनेक क्षेत्रांतून या चित्रपटाबाबत उत्सुकता व्यक्त केली जाते आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील बाळासाहेबांबद्दल या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. क्रिकेटरच नाहीतर अभिनेता संजय दत्त यांनी देखील बाळासाहेबांबद्दल गौरोद्गार काढलेत. त्याबरोबर बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं हे देखील ते सांगायला विसरले नाहीत.
मी शिकलो की आपल्या देशावर प्रेम करा. त्यांनी आम्हाला शिकवलं खरं बोलायला घाबरु नका आणि आपल्या मतावर ठाम रहा. त्यांनी जसं सांगितलं तसं ते आयुष्यभर वागले – अभिनेता संजय दत्त
एकंदरीत पाहता सर्वच क्षेत्रांतून या सिनेमाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचलीय. त्यामुळे या चित्रपटाला लोकांचा कसा प्रतिसाद लाभतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.