महेंद्र जोंधळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, लातूर: शिंदे गट आणि शिवसेना (shivsena) यांच्यातील कलगीतुरा अजूनही थांबलेला नाही. दोन्ही गटाकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यात येत आहे. तसेच आरोप-प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटही करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी तर युतीच्या काळात आम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळत होतं. पण ते मला द्यावं लागेल म्हणून उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) घेतलं नाही, असा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना उद्धव ठाकरे यांनीच शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलं होतं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच शिंदे हे टेम्पररी मुख्यमंत्री आहेत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे.
चंद्रकांत खैरे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आले होते. लिंगायत समाजाच्या वधूवर मेळाव्या प्रसंगी त्यांनी हे विधान केलं. एकनाथ शिंदे हे टेम्पररी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल भाजपमध्ये नाराजी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर ही नाराजी स्पष्टपणे दिसत आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव सूचवले होते. मात्र, आमचे मंत्री ज्येष्ठ आहेत. नवख्या माणसाबरोबर कसे काम करतील? असं शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, खैरे यांनी काल भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. अमित शहा सूर्य आणि उद्धव ठाकरे हे दिवा आहेत असं बावनकुळे म्हणाले. आज त्यांना मी सांगतो उद्धव ठाकरे भलेही दिवा असतील. पण तेच घराघरात जाऊन प्रकाश निर्माण करतील, असा पलटवार त्यांनी केला. दसरा मेळाव्यात आम्ही बोलणार नाही. सर्वांना उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकायचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
बावनकुळेंनी जास्त बोलू नये. जन संघाचं जुनं निवडणूक चिन्ह दिवा होतं. हे विसरू नये. सूर्य मावळतो. दिवा तेवत राहतो हेही बावनकुळे यांनी ध्यानात ठेवावं, असा इशारा त्यांनी दिला.
खोके आले म्हणून 10 हजार गाड्या मुंबईला नेण्याच्या गोष्टी होत आहेत. आता बघा गाड्या रिकाम्या जातील. कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मी न्यायालयाचे आभार मानतो. आता आमच्या सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मेळावा चांगला होईल, यात शंकाच नाही, असंही ते म्हणाले.
नारायण राणे यांना कोणी मोठे केलं हे राणे विसरले. त्यामुळे त्यांनी जास्त बोलू नये. नाहीतर आम्ही ही शिवसैनिक आहोत, या शब्दात त्यांनी नारायण राणे यांना दम भरला. नारायण राणे यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं आहे. याबाबत त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. त्यांची खासदारकी रद्द करावी त्याबाबत तक्रार करणार असल्याचं खैरे म्हणाले.