राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज? म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”

| Updated on: Jul 07, 2024 | 3:55 PM

राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रकांत खैरे यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज? म्हणाले उद्धव ठाकरेंनी...
चंद्रकांत खैरे राजू शिंदे
Follow us on

Chandrakant Khaire Reaction on Raju Shinde : भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणतील ते मान्य

“मी राजू शिंदे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी यायचं असेल तर या असे सांगितले होते. राजू शिंदे यांनी भुमरेंना मतदान जास्त मिळवून दिलं असंही सांगितलं. याचाच अर्थ त्यांनी मला पाडलं. पण आता उद्धव ठाकरेंनी जर निर्णय घेतला असेल तर माझी काहीही हरकत नाही. उद्धव ठाकरे म्हणतील ते मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली आहे.

आम्ही त्यांचं स्वागत करु

यापुढे चंद्रकांत खैरे म्हणाले, “कार्यकर्त्यांमध्ये हे रुजवणं खूप अवघडं असतं. उद्धव ठाकरेंसाठी आम्ही ते सहन करुन घेऊ. राजू शिंदे यांनी माझ्या विरोधात गेल्यावेळीही आणि आताही काम केले होते, याची मला १०० टक्के खात्री आहे. राजू शिंदेंनी आमच्यावर, उद्धव ठाकरेंवर अनेकदा टीका केली आहे. पण माणूस बदलतो आणि त्यानंतर तो माणूस आमच्याकडे येत असेल तर हरकत नाही. आम्ही त्यांचं स्वागत करु”, असे त्यांनी म्हटले.

चार महिन्यात काहीही होऊ शकतं

“विधानसभा निवडणुकीला अजून चार महिने बाकी आहे. त्यामुळे त्यांचं काम ठरवेल. या तीन-चार महिन्यात कोण येतं, कोण जातं, काय होतं हे हळूहळू पुढे येईल. कारण शेवटपर्यंत तिकीटाचे वाटप सुरु असते. उद्या फॉर्म भरायचा तर आदल्या दिवशीपर्यंत तिकीट वाटप होते. त्यामुळे काहीही होऊ शकतं”, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत. यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपच्या उपमहापौर राजू शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.