‘भीक मागणं हे शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच..’ चंद्रकांत पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंनाच गाठलं, काय झाला किस्सा?

| Updated on: Dec 20, 2022 | 1:51 PM

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली होती.

भीक मागणं हे शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच.. चंद्रकांत पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंनाच गाठलं, काय झाला किस्सा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः हिवाळी अधिवेशनात (Winter session) आज एक प्रसंग चांगलाच चर्चेत आहे. भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गाठलं. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचंच एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं. त्यातला भीक मागणं… हा उल्लेख वाचून दाखवला. महात्मा फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली.. या चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र आपण वापरलेल्या शब्दात काही गैर नव्हतं, हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी प्रबोधनकार ठाकरेंचंच एक पुस्तक दाखवलं…

विधानभवन परिसरात काय घडलं?

हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.

या पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. आपण केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकातदादांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना आपली बाजू सांगितली.

कोणत्या वक्तव्याचं समर्थन?

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सदर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. मात्र शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.
महापुरुषांनी भीक मागितल्याचं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पिंपरी येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईदेखील फेकण्यात आली.
त्यानंतर त्यांनी सदर वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली होती.

उद्धव ठाकरेंची टीका काय?

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. पण फुले दाम्पत्य नसते तर आपण मंत्री झालो नसतो.. एका मंत्र्याने भीक शब्द वापरून बौद्धिक दारिद्र्य दाखवून दिल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शब्दाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट म्हणून दिलं. त्यातील संदर्भ वाचून दाखवला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे तसेच आमदार प्रवीण दरेकर यांची हजेरी होती. आता उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.