मुंबई: भाजपने (bjp) तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला (mahavikas aghadi) राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) धोबीपछाड दिलं आहे. त्यामुळे भाजपचं मनोबल उंचावलं आहे. त्यामुळे भाजप आता विधान परिषद निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर महाविकास आघाडीला विधान परिषदेसाठी प्रस्तावच दिला आहे. विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याकरीता दोनच दिवस उरले आहेत. शहाणे आणि समजूतदार असाल तर आताच अर्ज मागे घ्या आणि निवडणूक बिनविरोध करा. नाही तर आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत, असा प्रस्तावच चंद्रकांत पाटील यांनी आघाडीला दिला आहे. तर, राज्यसभेची निवडणूक आपण जिंकलो. विधान परिषदेची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. त्यानिमित्ताने आज भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि पीयूष गोयल यांनी एकमेकांना पेढा भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरून शिवसेनेला डिवचत माघार घेण्याचं आवाहनही केलं.
4 जागा आपल्या कोट्यात आहे. आणखी दोन जागेसाठी आपण उमेदवार दिले आहेत. तेही निवडून येतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोडेल पण वाकणार नाही या भूमिकेतून शिवसेना बाहेर आली नाही. त्यामुळे निवडणूक लागली आणि ही परिस्थिती निर्माण झाली. महान नेते संजय राऊत याना सहाव्या क्रमांकावर जावं लागलं. ते हुशार असतील तर विधान परिषदेच्या जागेसाठी 13 जून रोजी अर्ज मागे घ्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस प्रेमळ आहेत. माणसांना रिसिव्ह करतात. त्यांच्याशी गोड बोललं तर त्यांचा शर्टही काढून घेता येतो. इथे तर सीट काढून घेण्याचा प्रश्न आहे. दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे शहाणपण म्हणून ते निवडणूक बिनविरोध करतील अशी आशा आहे. अन्यथा निवडणूक लढवू, असं पाटील म्हणाले.
देवेंद्र लोकांना सांभाळतात. लोकांचं प्रेम देतात असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. पवारांचा निशाणा वेगळाच होता. पवारांना समजणं सोपं नाही. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. कोणी तरी फडणवीसांकडून शिका असं त्यांना म्हणायचं होतं. अरे अडीच वर्षात शिकवलं का नाही? असा सवाल पाटील यांनी केला.
आघाडीचा पराभव होणार हे पवारांच्या दुपारीच लक्षात आलं होतं. त्यामुळे ते पुण्याला निघून गेले. ही त्यांची दुरदृष्टी आहे. मला पत्रकारांनी विचारलं विधान परिषदेत काय होणार? मी म्हणालो, काय होणार? जे राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होणार. त्याच्या दोन पावलं पुढे होणार. राज्यसभेत मत दाखवायचे होते. काही लोकांनी फडणवीसांचा हात दाबून सांगितलं सिक्रेट बॅलेटमध्ये तुम्हाला मतदान करणार. फडणवीसांचा हात दुखतोय इतक्या लोकांनी त्यांचा हात दाबला, असं सूचक विधानही त्यांनी केलं.