महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्यासोबत पंतप्रधानांचा भेदभाव नाही; चंद्रकांतदादांनी आरोप फेटाळले

| Updated on: May 21, 2021 | 4:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले, पण महाराष्ट्रात आले नाही. मोदींनी महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. (chandrakant patil reaction on pm modi's gujarat visit)

महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्यासोबत पंतप्रधानांचा भेदभाव नाही; चंद्रकांतदादांनी आरोप फेटाळले
chandrakant patil
Follow us on

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले, पण महाराष्ट्रात आले नाही. मोदींनी महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. मोदींनी महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही, असं सांगतानाच मोदींनी तौक्ते वादळात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक राज्यातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. (chandrakant patil reaction on pm modi’s gujarat visit)

चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांवर पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे. केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ही राज्ये तसेच दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेलीमधील वादळाच्या तडाख्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. त्याशिवाय या सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाहीही दिली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्र किंवा इतर राज्यांशी भेदभाव केला असं म्हणता येणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र दौराही ठरला होता

मोदींचा गुजरातसोबत महाराष्ट्र दौराही ठरला होता. परंतु हवामान खात्याने त्यावेळी राज्याच्या सागरी पट्ट्यात हवाई प्रवास करण्याबाबत प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे तो दौरा रद्द झाला आणि पंतप्रधान गुजरातकडे रवाना झाले, असा दावाही त्यांनी केला. सुरक्षा यंत्रणांचा सल्ला ध्यानात घेतल्यानंतर आणि अधिकाधिक परिसराची पाहणी करता यावी यासाठी पंतप्रधान हवाई पाहणी करतात. त्यानुसार मोदींनी गुजरातमधील नुकसानीची हवाई पाहणी केली. काँग्रेसच्या नेत्या व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या सुद्धा अशाच पाहणी करत होत्या. हवाई पाहणी म्हणून टीका टिप्पणी करणाऱ्यांना थोडे इतिहासाचेही भान असायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी शिकवू नये

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरही टीका केली. मुख्यमंत्री चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यास कधी नव्हे ते घराबाहेर पडले आहेत. त्यांनी इतरांना आपला हवाई प्रवास नाही तर जमिनीवरून प्रवास आहे, असे शिकवू नये. ते जमिनीवरून प्रवास करत आहेत आणि त्यांचे पायही जमिनीवर असतील तर त्यांना शुभेच्छा. त्यांनी विसरू नये की, भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वादळ आल्यानंतर ताबडतोब रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा प्रवास सुरू केला आहे. त्यांनी हवाई नव्हे तर जमिनीवरून तीन जिल्ह्यांचा विस्तृत प्रवास केला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. (chandrakant patil reaction on pm modi’s gujarat visit)

 

संबंधित बातम्या:

Monsoon Rain : मान्सून अंदमानात दाखल, हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला!

‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रयत्न; राष्ट्रवादीची टीका

(chandrakant patil reaction on pm modi’s gujarat visit)