पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलंय. “नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. विधानभवनाच्या उपसभापती झाल्यानंतर पदावरील व्यक्तीला पक्ष नसतो. मात्र, नीलम गोऱ्हे पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत. त्यांचे गेल्या 2 महिन्यांचे लेख आणि वक्तव्यं आम्ही काढत असून याला न्यायालयात आव्हान देणार आहोत,” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते नारायण राणे यांच्यावरील कारवाईच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “नीलम गोऱ्हे कोणत्या कॅपेसिटीत बोलत आहेत? विधान परिषदेचा उपसभापती झाल्यानंतर त्यांना पक्ष नसतो. गेल्या महिना दोन महिन्यातील नीलम गोऱ्हे यांचे लेख आम्ही काढतोय. त्यांची सर्व वक्तव्यं काढतोय आणि आम्ही न्यायालयात जाणार आहोत. हे स्थान पक्ष विरहीत असताना या पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून कशा बोलतात?”
“शिवसैनिकाने सहन न होऊन केस दाखल करणं स्वाभाविक आहे, पण अटक कशी? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना पंढरपुरात पंतप्रधान मोदींना चोर म्हणाले त्याचं काय करायचं? आता मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिलेलं भाषण काढा. त्यावर किती गुन्हे दाखल करणार? त्यामुळे एखाद्यानं म्हणणं आणि त्यावर दुसऱ्या पक्षानं काही तरी म्हणणं हा प्रघात आहे. लगेच गुन्हा दाखल करणं आणि अटक करणं सुडबुद्धीने होतंय,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का नाही असाही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “ज्यावर गुन्हा दाखल करायला हवा ते पेंडिंग आहे. संजय राठोड यांचं काय झालं? त्यांची केस कुठं अडकली आहे? राष्ट्रवादीच्या युवक आघाडीच्या एका नेत्यानं औरंगाबाद जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार केला, ती टाहो फोडून सांगतेय त्यावर गुन्हा दाखल होत नाही अटक होत नाही. दुसरीकडे नारायण राणे एक वाक्य म्हणाले त्यावर तुम्ही प्रशासकीय समज देऊ शकता, पण अटक करणं हे सुडबुद्धीने सुरू आहे. कोकणात त्यांना जसा प्रतिसाद मिळतोय त्याला रोखण्यासाठी हे सुरू आहे. पण बॉल आपटला की तो उसळी मारुन वर येतो.”
Chandrakant Patil say will go court against Neelam Gorhe’s political statement