पुणे : बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखायच्या असतील, तर कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज आहे, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी रात्री पाटील यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. तसेच, भाजपा आपदा कोषच्या माध्यमातून दोन लाखाची आर्थिक मदत देण्यासोबतच, कायदेशीर सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन देण्याचं आश्वासनही कुटुंबियांना दिलं आहे. (Chandrakant Patil’s criticism that there was no fear of law during Mahavikas Aghadi government)
या भेटीवेळी मुलीच्या दिव्यांग भावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा हत्याकांडातील आरोपीला व्हावी, अशी मागणी केली. यानंतर पाटील यांनी कुटुंबियांना धीर देत गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मृत मुलगीच कुटुंबाचा आर्थिक आधार असल्याने, तिच्या हत्येने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देऊ केली.
यानंतर प्रतिक्रीया देताना पाटील म्हणाले की, “आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांचा दोषसिद्धी दर फक्त 9 टक्के होता. ही सर्वांसाठी चिंतेची बाब होती. पण माननीय देवेंद्रजींच्या काळात राज्यात कायद्याचा धाक होता. त्यामुळे दोषसिद्धीदर (कनव्हिक्शन रेट) 53 टक्के इतका होता. पाच वर्षात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक होता. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले की, पीडित कुटुंबियांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक वकील देखील देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बिबवेवाडीमध्ये 12 ऑक्टोबर रोजी एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची हत्या झाली होती. ही मुलगी कबड्डीपटू होती. ती आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. आरोपी हा अत्यंत त्वेषाने अल्पवयीन मुलीकडे गेला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. त्यावेळी आरोपींनी मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार झाल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. त्यामुळे काही क्षणात मुलीचा मृत्यू झाला.
इतर बातम्या :
प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण, सर्व पुरावे क्राईम ब्रँचकडे; समीर वानखेडेंवर मुंबई पोलिस कारवाई करणार?
‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
Chandrakant Patil’s criticism that there was no fear of law during Mahavikas Aghadi government