चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीतसिंग चन्नी अखेर शपथ घेतली आहे. त्यामुळे ते राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत दोन मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. (Charanjit Singh Channi takes oath as Punjab chief minister)
चरणजीतसिंग चन्नी यांनी आज सकाळी राजभवन येथे जाऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चन्नी यांच्याशिवाय सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओपी सोनी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. या दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, चन्नी यांच्या मंत्रिमंडळातील केवळ दोनच मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे चन्नी कॅप्टन अमरिंदर सिंगच्या टीममधील मंत्र्यांना पुन्हा संधी देणार की गुजरात फॉर्म्युल्यानुसार नवीन चेहऱ्यांना संधी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चन्नी मंत्रिमंडळातील जातीय समीकरण कसे राखतात, किती महिलांना संधी देतात आणि अनुभवी नेत्यांचा वापर कसा करतात? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते भावूक झाले होते. हायकमांडने एका सामान्य माणसाला मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली आहे. ज्याच्या घराला छत नव्हतं, आज काँग्रेसने त्याला मुख्यमंत्री केलं आहे, असं भावूक उद्गार चन्नी यांनी काढलं.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घेण्याचं आवाहन केलं. कृषी कायदे मागे घेतलं नाही तर कृषी व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल. त्याचा पंजाबच्या प्रत्येक घराला फरक पडेल. परंतु आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांना कमजोर होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यापूर्वीच काँग्रेसने दलित मुख्यमंत्री करून मोठा डाव टाकला आहे. पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री झाल्याने पंजाबची राजकीय समीकरणेही बदलून गेली आहेत. अकाली दलाने सत्ता आल्यावर दलित समाजातील नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला आम आदमी पार्टीने प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र, काँग्रेसने नवी खेळी करत अकाली दल, बसपा आणि आपची हवा काढून घेतली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
चरणजीतसिंग चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते अमरिंदर सिंग सरकारमध्ये शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री होते. त्यापूर्वी ते 2015 ते 2016पर्यंत पंजाबमध्ये विरोधी पक्षनेते होते. चरणजीतसिंग चेन्नी हे रामदासिया शीख समुदायातील आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये ते 16 मार्च 2017मध्ये वयाच्या 47व्या वर्षी कॅबिनेट मंत्री झाले होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा आमदार झाले होते. चरणजितसिंह चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात.
चरणजितसिंह हे 48 वर्षांचे आहेत. पंजाबमध्ये दलितांची टक्केवारी ही 30 टक्क्यांच्या आसपास आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही सर्व मतं निर्णायकी ठरतील असा अंदाज बांधून चन्नींना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचं जाणकार सांगतायत. (Charanjit Singh Channi takes oath as Punjab chief minister)
VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 20 September 2021https://t.co/Ayaqym7mfn#FastNews #Mahafast100 #KiritSomaiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
संबंधित बातम्या:
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून दलित नेत्याला संधी, चरणजितसिंह चन्नींच्या नावाची घोषणा
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?
(Charanjit Singh Channi takes oath as Punjab chief minister)