…म्हणून मी तलवार काढण्याची भाषा केली- संभाजीराजे

| Updated on: Oct 09, 2020 | 7:04 PM

मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक आणि जाळपोळ झाली असती

...म्हणून मी तलवार काढण्याची भाषा केली- संभाजीराजे
Follow us on

सोलापूर: मी केवळ तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळ पडल्यास मी तलवार काढेन, असे वक्तव्य केले होते. मात्र, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, मी तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळप्रसंगी मी तलवार काढेन, असे वक्तव्य केले. मात्र, त्याचा काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी चुकीचा अर्थ काढत समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला. मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक आणि जाळपोळ झाली असती, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

तुळजापुरात आयोजित सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्च्यात मराठा समाज संतापलेला होता. राजे तुम्ही आम्हाला म्यानातून तलवारी काढण्याची परवानगी द्या, असा जनतेतून आक्रोश होता. या सगळ्याला आक्रमक वळण मिळू नये म्हणून मी जमावाला शांत करण्यासाठी तुम्हाला तलवार काढण्याची गरज नाही ,वेळप्रसंगी मी तलवार काढेन, असे म्हटले. मात्र, त्याचा विपर्यास करण्यात आला, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार? का समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी? मराठा समाजासह कोणत्याही समाजाचे नुकसान होता कामा नये. म्हणून राजेंना सांगतोय मध्य मार्ग काढता येतो का बघा, अशी भूमिकाही विजय वडेट्टीवार यांनी मांडली होती.