Chhagan Bhujbal First Reaction : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानतंर प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी “बंगल्यावर जाऊन बोलतो”, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यानतंर त्यांनी आता लगेचच एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं कारण काय होतं, याबद्दल सविस्तर भाष्य करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे महायुतीसोबत गेले. गेल्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक महत्वाचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर आता वर्षभरानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी १० च्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यानंतर गेल्या तासभरापासून ते शरद पवारांच्या भेटीसाठी वेटींगवर होते.
छगन भुजबळांनी शरद पवारांची कोणतीही वेळ घेतली नव्हती. ही वेळ न घेताच ते सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या बंगल्यावर पोहोचले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी उपस्थित होते. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज भुजबळांनी थेट पवारांचे निवाससथान गाठल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ अचानक पवारांच्या भेटीसाठी का आले याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र त्यामुळे अनेकांची उत्सुकता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.