स्वप्नील उमप, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, हिंगोली | 26 नोव्हेंबर 2023 : वंचितचे नेते, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यांना माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी या ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्यानंतर आता ओबीसी नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आंबेडकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हिंगोलीत आज ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी छगन भुजबळ निघाले होते. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे काँग्रेसचे नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राजू सातव यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला.
मी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बोललो नाही. एकही शब्द उच्चारला नाही. या अडचणीच्या काळात आम्हाला प्रकाश आंबेडकर यांचं सहकार्य हवं आहे. तुम्ही मंडल आयोगासह अनेक मुद्द्यावर खूप मेहनत घेतली आहे. आता तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. मला खात्री आहे एक दिवस तुम्ही आमच्यासोबत याल, असं छगन भुजबळ म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसींचं ताट वेगळं आहे असं सांगितलं. त्यामुळे आम्ही योग्य मार्गावर असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
छगन भुजबळ हे हिंगोलीकडे जात असताना तीन ठिकाणी त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन तीन ठिकाणी ठिकाणी दोन चार पाच लोक होते. कुठेही माझा ताफा अडला नाही आणि थांबला नाही, असं सांगतानाच या देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी सभेसाठी जाणार आहे, असं भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला आहे. त्यावर रासप नेते महादेव जानकर यांनी भाष्य केलं आहे. लोकशाही मार्गानं सगळ्यांनी जायला पाहिजे. काळे झेंडे दाखवून काहीही होणार नाही. ओबीसीचं आंदोलन देखील शांतेतं चालावं. कुणीही कुणाला रोखण्याचा प्रयत्न करू नये. भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले तर चांगलं आहे. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं तरी चांगलं आहे. तसेच भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री केलं तरी चालेल, असं महादेव जानकर म्हणाले.