नाशिक: हिंदुत्व आणि राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता? हे कसले हिंदुत्ववादी?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. (chhagan bhujbal slams bjp over hindutva)
नाशिकमध्ये टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपच्या अध्यात्मिक सेलने मंदिर उघडण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरही टीका केली. मंदिरं खुली केली नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची आहे. केवळ भाजपच सत्तेत राहू शकते का? इतरांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही का?, असा सवाल करतानाच अनेक राज्यांमध्ये अजूनही मंदिरे उघडण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे, असं सांगतानाच सर्व उपाययोजना करूनच राज्यातील मंदिरं खुली केली जाणार असल्याचे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले.
भुजबळ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरले. हे कसले हिंदुत्ववादी आहेत. इथे गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता. हेच का तुमचं हिंदुत्व, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, कालपासून भाजपच्या अध्यात्मिक सेलच्यावतीने तुळजापूरमध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे या परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं होतं. शिवाय मंदिर परिसरात 300 मीटरपर्यंत कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे अध्यात्मिक सेलनेही आज निदर्शने करून आजचं आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, पुढील काळात मंदिरं न उघडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल हे चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे ते या नावांना विरोध करतील असं वाटत नाही, असं सांगतानाच काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला होता.
राज्यात दिवाळीत फटाके न वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केलं. राज्यात फटाक्यांवर बंदी नाही. मात्र फटाके न वाजवण्याचं आवाहन करण्यता आलं आहे. फटाक्यांचा धूर कोरोनाग्रस्तांसाठी हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे हे आवाहन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कालच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. राज्यात थंडी पडली असून वातावरण बदललं आहे. त्यामुळे कोरोनाचा कोणताही धोका उद्भवू नये म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. (chhagan bhujbal slams bjp over hindutva)
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 November 2020https://t.co/WRjifefiwR
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
संबंधित बातम्या:
राज्यपाल चांगली व्यक्ती, ‘त्या’ नावांना विरोध करणार नाहीत; भुजबळांचा टोला
रोहित पवारांना ‘अव्वल’ आणण्यासाठी मातोश्रींनी कंबर कसली, सुनंदा पवार कर्जत-जामखेडच्या मैदानात
(chhagan bhujbal slams bjp over hindutva)