‘तू डोक्याने दिव्यांग झालाय’, जरांगेंची मिमिक्री करत भुजबळांनी उडवली खिल्ली

| Updated on: Dec 09, 2023 | 5:43 PM

"मी 15 दिवसांनी बोलतो. पण एक आहे, सौ सोनार की और एक लोहार की. त्यामुळे थोडसं बोलावं लागतं, सांगावं लागतं, सर्वच काही ऐकून घेण्याची सवय आमच्यापैकी कुणालाच नाही. छगन भुजबळला सुद्धा ऐकायची सवय नाही. राज्यात अशांतता करतंय कोण?", असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

तू डोक्याने दिव्यांग झालाय, जरांगेंची मिमिक्री करत भुजबळांनी उडवली खिल्ली
Follow us on

पुणे | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यानंतर त्यांनी जरांगेंची मिमिक्री करत खिल्ली उडवली. “मनोज जरांगे यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणं चूक आहे. आपण दिव्यांग म्हणतो. ते काय म्हणाले ते मी वाचून दाखवतो,” असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्या हिंदी भाषेत केलेल्या वक्तव्यावर टीका करतात. “तू डोक्याने दिव्यांग झालाय, तुला हिंदीसुद्धा येत नाही”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

“आता बघा ते जरांगे 15 दिवस फिरत आहेत. सकाळपासून त्यांच्या बैठका. आपली मिटिंग रात्री 10 वाजता बंद होईल. त्यांची मिटिंग रात्री 12 किंवा 1 वाजेला. रात्री 2 वाजता बैठक. त्यांना परवानगी आहे की नाही ते कळत नाही. पोलीस सुद्धा कारवाई करत नाही. ते म्हणले तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला. मी 15 दिवसांनी बोललो की ताबोडतोब सुरु, महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम ते आणि मी करतोय. ते करताय ते खरंच आहे. मी काय केलंय?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.

“मी 15 दिवसांनी बोलतो. पण एक आहे. सौ सोनार की और एक लोहार की. त्यामुळे थोडासं बोलावं लागतं, सांगावं लागतं, सर्वच काही ऐकून घेण्याची सवय आमच्यापैकी कुणालाच नाही. छगन भुजबळला सुद्धा ऐकायची सवय नाही. राज्यात अशांतता करतंय कोण? बरोबर आहे. राज्याच शांतता असेल तर उद्योगधंदे येतील. बेरोजगारी दूर होईल. राज्याची आर्थिक स्वयत्ता वाढेल. हे सगळं मान्य आहे. पण राज्यात अशांतता निर्माण करतंय कोण याचा विचार करण्याची आवश्यकता आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

‘दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिलं जाईल’

“छगन भुजबळ 24 तारखेला तुला दाखवतो, असे बोलत आहेत. आमचा मराठा समाजाला विरोध नाही. आमचा विरोध हा झुंडशाहीला आहे. ही दादागिरी अशीच चालू राहिली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिलं जाईल. हे सुद्धा सांगू शकतो. आमच्यावर जबाबदारी टाकू नका की, राज्यात शांतता बिघडवली. आम्हाला बोलू नका. त्यांना सांगा की, बोलताना नीट बोला. पोलिसांवरील हल्ले थांबवा”, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

“सरकार आणि पोलीस महासंचालकांना सांगतो, तुम्ही वेळेवर कारवाई केली नाही तर तुम्ही पोलीस पुढे काही करणार नाहीत अशी अशांतता हे लोक राज्यात माजवतील. तुम्ही फक्त रिव्हॉलव्हर घेऊन उभेच राहणार? बीडमध्ये आमदारांच्या घरावर हल्ले झाले, बायका-मुली कशातरी वाचल्या. क्षीरसागर कुटुंबियांना मुसलमान समाजाने वाचवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हे शिकवलं? आपल्याच स्वकियांवर, बायका-मुलांवर हल्ला करा?”, असे सवाल भुजबळांनी केले.

भुजबळांचा मराठा लोकप्रतिनिधींना रोखठोक सवाल

“या महाराष्ट्रात विचार करणारा मराठा समाजही आहे. पण तो का बोलत नाही? मोठमोठे नेते आहेत ते सुद्धा बोलत नाहीत. कसली भीती वाटते. निवडणुकीच्या मतांची? अरे त्यांच्याकडे 20 टक्के आहेत तर आमच्याकडे 80 टक्के आहे. आणि सांगणार काय? सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्या. आपल्या इथे हर्षवर्धन पाटील आहेत, कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का? आमचे जुने मित्र विजयसिंह मोहिते पाटील आहेत, कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का? अरे बोलाना, पाहिजे तर बोला. नको तर नकोच म्हणा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या म्हणजे एकही मराठा राहणार नाही. सगळे शांत बसले आहेत. कशासाठी तर निवडणुकीसाठी? मग या गोष्टींना आळा घालणार नाहीत का?”, असा रोखठोक सवाल भुजबळांनी केला.