भाऊबीजेचा आज सण असल्याने संपूर्ण राज्याच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाऊबीज सण आला आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज भाऊबीज साजरी करणार का? अजितदादा आज गोविंदबागेत येणार का? अशी चर्चा रंगली आहे. आज सकाळीच अजितदादांनी गोविंदबागेत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, दिवसभरात काहीही घडू शकतं असं वाटत असल्याने बारामतीकरांचा जीव टांगणीला लागला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यात उडी घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी हे आवाहन केलं आहे. बारामतीत थोडी तणातणी आहे. पण दादा आणि ताईंनी संध्याकाळपर्यंत एकत्र यावं. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ. संध्याकाळपर्यंत एकत्र आले नाही तर निदान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला त्यांनी एकत्र आले पाहिजे. राजकीय विचार काही असू शकतात. शरद पवार साहेब म्हणाले, कुटुंब फुटू देणार नाही. त्याचा विचार दोघांनीही करावा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
बारामतीच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. विरोधी पक्षातील नेते अजितदादा यांना निवडणूक सोपी आहे असं बोलणार का? असा सवाल करतानाच 18 तारखेपर्यंत हे सगळे असे बोलणारच. 5 तारखेपासून प्रचाराची धार वाढेल. मतदार ठरवतील कुणाला जिंकून आणायचे, असं भुजबळ म्हणाले.
अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उलटेसुलटे विधानं येत असतात. मुख्यमंत्री पण बोलले माझ्यासोबत काही चर्चा झालेली नाही. आता मुंबईतील नेते यासंदर्भात निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच फटकारलं आहे. आव्हाड यांनी अजितदादांबाबत अपशब्द वापरले होते.त्यावरून भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. मला जितेंद्र आव्हाडांना सांगायचं आहे की, यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळा चुकीच्या शब्दांचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यानं अडचणीत आला आहात हे लक्षात ठेवा. माझा सल्ला राहील. मानायचा की नाही ते पाहावं. पण शब्द कोणते वापरावे याचा विचार केला पाहिजे. विचारपूर्वक बोललं पाहिजे. कुणाला चोर म्हणतो, कुणाल पाकिट मार म्हणतो ते पाहावं. जे 20-20 आणि 25-25 वर्ष तुमच्यासोबत राहिले त्या सर्वांना तुमचे हे बोल लागू होतात. मला वाटतं की एवढ्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांना पुढे आणण्यात पवारांचा हात आहे. तसा भुजबळांचाही आहे. हे त्यांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही सर्वांना विशेषण लावतात ते दु:ख वाटतं. त्यांनी सांभाळून बोलावं, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.