छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत. अशात नरेंद्र मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बिहारमध्ये काल एक बैठक बोलावली होती. यात विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या या बैठकीवर एमआयएमने नाराजी व्यक्त केली आहे. असदुद्दीन ओवैसी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तिथे बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
विरोधकांचा आमच्यावर विश्वास आहे की नाही हे मला माहित नाही,आम्हाला का दुर्लक्षित केल हे बरोबर नाही, असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
शिवाय मी स्वतःहून त्यांच्या बैठकीत जाणार नाही. भाजपाला हरवण्यासाठी अजेंडा गरजेचा आहे, असंही असदुद्दीन ओवेसींनी स्पष्ट केलं आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनीही या बैठकीला न बोलावण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. कालच्या पाटन्याच्या बैठकीत एमआयएमला बोलावलं नाही.भाजपला हरवण्यासाठी एमआयएमला दुर्लक्षित करून चालणार नाही. आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही आम्हाला बोलवा आम्ही बैठकीला येऊ, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
आम्हालाही वाटत भारत अमेरिका संबंध चांगले व्हावेत. पंतप्रधानांनी तिकडे पत्रकारांशी न बोलता दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधावा. भारतात अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत नाही असं ते तिकडे म्हणाले मणिपूरमध्ये चर्च जाळली आहेत, ते काय आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती बाबत अन्याय होतो ते काय आहे. अल्पसंख्याकांच्या अन्यायाबाबत दिल्लीत पत्रकारांशी बोला, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे.
राज्यातील पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी. महाराष्ट्रातील हरकती बरोबर नाही, कोल्हापूरमध्ये झालेल्या तणावावर ओवैसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कोणते फोटो ठेवायचे नाही याची यादी राज्य सरकारने बनवावी, असं औरंगजेबच्या फोटोवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडेंना 2 वर्षांपूर्वी इम्तियाज जलील यांनी ऑफर दिली आहे. त्यांनी विचार करायला हवा. BRS आधीच आम्ही त्यांना ऑफर दिली आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांना पक्षांतराच्या ऑफरवर ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा मी मान ठेवत होतो. ठेवत आहे आणि ठेवत राहीन, असंही ते म्हणाले आहेत.