पंढरपूर (सोलापूर) : रायगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती प्रकाशव्यवस्था करण्यात आली. मात्र, या प्रकाशव्यवस्थेवर शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारतीय पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संभाजीराजेंना दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह वाटतं, असा टोला लगावला होता. मात्र, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीराजेंची बाजू घेतली होती. त्यानंतर आता संभाजीराजे यांनी या विषयावर भूमिका मांडली. पंढरपूरात ते बोलत होते. यावेळी पहिल्यांदाचा शांत, संयमी स्वभावाचे संभाजीराजे आक्रमक बघायला मिळाले (Chhatrapati Sambhajiraje angry on Raigad fort lighting).
संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
“मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचं दाखवा, तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो. मी समाजासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजीराजेंना टारगेट केल्यास टीआरपी वाढतो”, असा टोला संभाजीराजेंनी लगावला (Chhatrapati Sambhajiraje angry on Raigad fort lighting)
“मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही. पण किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
“शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्यावर करण्यात आलेली विद्यूत रोषणाई पाहून पुरातत्व खात्यासाठी कालचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे. महाराजांचे वास्तव, समाधी असलेल्या रायगडावर अशी लायटिंग चुकीची आहे. पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी. रायगड मॉडेल प्रमाणे दहा किल्ले संवर्धनासाठी घेणार. किल्ले जतन करण्यासाठी फोर्ड फेडरेशन स्थापन करण्यात आली आहे. पण जतन आणि संवर्धनचा अर्थ देखील पुरातत्व विभागाला माहिती आहे का?”, असा सवाल संभाजीराजेंनी केला.
अजित पवार काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. यात काहीवेळा अजाणतेपणी म्हणा किंवा फार उत्साहामध्ये म्हणा अशा गोष्टी होतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला यापुढे काळजी घ्यावी लागेल”, असं अजित पवार म्हणाले.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
रायगडावरील लायटिंगबाबत जे घडलं त्याबाबत मला जास्त माहिती नाही. माध्यमातून वाचनात आलं आहे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. याबाबत संभाजीराजे छत्रपती अधिक बोलू शकतील, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
शिवजयंतीवर निर्बंध आहेत, मात्र शिवभक्त म्हणून माझी सुद्धा भावना आहे की हे जे निर्बंध घातलेत त्यामुळे माझाही हिरमोड झाला. आपण दोन पावले मागे आलो, पण पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करू. ही शिवजयंती साधेपणाची नाही, कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.
खासदार श्रीकांत शिंदेंचं चुकलं काय?
स्वत:च्या खर्चाने रायगडावर शिवजयंतीपूर्वी आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ही लायटिंग करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहाराचेही शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. विशेष शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी दोन लाखाची आर्थिक मदत दिली. तसेच श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे पालकत्वदेखील स्वीकारले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चार दिवसापूर्वी रायगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांकडे लक्ष्य देऊन त्यांच्यावर उपाय सूचवले. निसर्ग वादळानंतर रायगड किल्यावरील विद्युत रोषणाई कोलमडली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ही बाब शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी येथील विद्युत रोषणाईचे साहित्य स्वतः देण्याची घोषणा केली. तसेच, 19 फेब्रुवारी पूर्वी रायगड उजळला पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले होते.
संबंधित बातम्या :