नाशिक | 28 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगे सोयरे यांच्या संदर्भात अध्यादेश काढला. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी वाशी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची सकाळी 8 वाजता भेट घेतली. जरांगे पाटील यांचे उपोषण त्यांनी संपविले. सरकारने काढलेल्या या अध्यादेशानंतर ओबीसी नेते संतापले आहेत. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केलाय.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन हा अध्यादेश काढण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे असे मनोज आखरे यांनी म्हटले आहे. सरकारला मुळात 57 लाख नोंदी सापडल्याचं नाही. त्यामुळे शासनाने मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपर्यंत जे काही बोलले ते सर्व धादांत खोट आहे असा आरोप मनोज आखरे यांनी केला आहे.
मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. पण मुख्यमंत्री यांनी सगेसोयरे याचे स्पष्टीकरण द्यावे. शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हेतू पुरस्कर मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी अद्याप अपूर्णच आहे याकडे मनोज आखरे यांनी लक्ष वेधले आहे.
पितृसत्ताक सोबत मातृसत्ताक विवाह ग्राह्य धरावे. मनोज जरांगे यांची दिशाभूल होत आहे पण ते त्यांना कळल नसेल. भुजबळांना जर सामाजिक जाण असती तर त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं नसतं. भुजबळ यांनी 2 जातीमध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम केलं आहे. भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा म्हणून काम करत आहेत अशी टीकाही मनोज आखरे यांनी केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिलाय. विरोधकांना कितीही हरकती घेतल्या तरी आपण पॉझिटिव्ह राहू. आपल्यासाठी हा कायदा पाहिजेच यासाठी सोशल मीडियातूनही त्याचे फायदे सांगा. सोशल मीडियातून दबाव वाढवा असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.