मुंबईः यंदा दहीहंडीवरील (Dahihandi) निर्बंध उठवल्या नंतर राज्यात विशेष करून मुंबई व ठाण्यात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात आला. परंतु या उत्सवादरम्यान दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा (Govinda) जखमी झाले. काही गोविंदांना जास्त मार लागला आहे तर बरेच गोविंदा किरकोळ जखमी झाले. अजूनही अनेक गोविंदावर मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अनुषंगाने आज या गोविंदा पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून त्वरित मदत जाहीर केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वातील एका पथकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गंभीर जखमी गोविंदाला 7.5 लाख रुपयांची मदत केली तर अन्य तिघांना 5 लाख रुपयांचा आर्थिक निधी देऊ केला.
प्रथमेश सावंत, करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळाचा गोविंदा हा गंभीर जखमी झाला असून मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रथमेश सावंत याला 7.5 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच संदेश दळवी, अविनाश भोईर, समीर गुढेकर, संतोष शिंदे या चार जखमी गोविंदांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच दहीहंडी च्या दिवशी जे कोणी गोविंदा जखमी झाले असतील त्यांना पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
यंदा दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार, राज्यातील शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद रुग्णालये यांना निःशुल्क वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी हा निर्णय लागू राहील, असेही मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गोविंदा पथकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ गोविंदांनाही मिळणार आहे. तसेच दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णयही राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.