यवतमाळ: राज्यातील मंत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ पत्रकारांवरच भडकल्या. न्याय व्यवस्था है क्या आप? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी पत्रकारांवर आगपाखड केली. चित्रा वाघ यांना अचानक पत्रकारांवर भडकलेलं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
भाजप नेत्या चित्रा वाघ आज यवतमाळ दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना संजय राठोड प्रकरणाबाबतचा सवाल करताच चित्रा वाघ भडकल्या. त्या तावातावाने उभ्या राहिल्या आणि पत्रकारांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली.
भडकलेल्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांना हिंदी भाषेतूनच झापण्यास सुरुवात केली. न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हू ना न्यायालय में. आप मुझको मत सिखाईये, असं त्यांनी संतापत म्हटलं.
असल्या पत्रकार ना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात, असं म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. यावेळी त्यांच्या संतापाचा पारा अनावर झाला होता. त्यांनी हातवारे करतच पत्रकारांना झापलं.
संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांची चांगलीच कोंडी झाली आहे. या प्रकरणावर चित्रा वाघ नरमतील असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आपला त्यांच्या विरोधातील लढा सुरूच राहील असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे चित्रा वाघ विरुद्ध संजय राठोड असं चित्रं दिसेल असं वाटत होतं.
मात्र, चित्रा वाघ यांनी कालच माझ्यासाठी संजय राठोड हा विषय संपला असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राठोड यांचा राजीनामा मागणाऱ्या आणि त्यांनी कठोर शिक्षा होण्याची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ अचानक बॅकफूटवर गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आज चित्रा वाघ यवतमाळमध्ये आल्यावर या संदर्भानच त्यांना सवाल करण्यात आला. त्यावेळी मात्र, त्यांनी आपला सर्व राग पत्रकारांवर काढला.