मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून चित्रा वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवलं आहे. (Chitra Wagh appointed incharge of Maharashtra BJP Yuvati division)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चित्रा वाघ यांनी जवळपास 20 वर्षे काम केलं. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली. परंतु 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही चित्रा वाघ यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तिथेही चित्रा वाघ यांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक दाखवली. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव एका युवतीच्या मृत्य प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांचा मोठा वाटा राहिला. भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खूश आहे. त्याचमुळे त्यांच्या हाती आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.
सस्नेह नमस्कार… भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण ही जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात… गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात.. युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ‘भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी’ म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे… आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे… आपल्या आगामी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा… आपला चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार मानले आहेत.
(Chitra Wagh appointed incharge of Maharashtra BJP Yuvati division)
हे ही वाचा :
थोरातांची कन्या म्हणाली, तुमच्या भाषेवरुन संस्काराची ओळख होते, आता पडळकरांचं प्रत्युत्तर