सोलापूर : उर्फी जावेद तिच्या वेगळ्या ड्रेसिंग सेन्समुळे प्रसिद्ध आहे. तिच्या या ड्रेसिंग स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतलाय. असली स्टाईल सामाजिक वातावरण बिघडवते. उर्फी जावेदनं हे असं वागणं बंद करावं. अन्यथा थोबाड रंगवेन, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि चित्रा वाघ यांच्यात वाद निर्माण झालाय. त्यावर आज सोलापुरात पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीची व्यक्ती आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर घणाघात केलाय.
फक्त अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाहीत. तर महिला आयोगाला सदस्य असतात. एवढंच नव्हे तर राज्याचे पोलीस संचालकही महिला आयोगाचे सदस्य असतात. त्यामुळे चाकणकरांनी कुणाशी बोलून नोटीस पाठवलीय की आपली आपण पाठवली हे प्रश्न अनुत्तरित आहेत. येत्या दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने सगळ्या गोष्टी समोर आणू, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
आमचा महिला आयोगावर आक्षेप नाही. महिला आयोग ही एक स्वतंत्र आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था आहे. अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती चुकीची असली तर महिला आयोगावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे महिला आयोगाने मला पाठवलेल्या नोटीशीचं मी उत्तर दिलंय. पण मला जी नोटीस आली ती रुपाली चाकणकर यांनी एकटीने पाठवली की महिला आयोगाच्या इतर सदस्यांचाही विचार घेतलाय? माहिती नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
असल्या नोटीसांना मी घाबरत नाही. असल्या छप्पन नोटीसा येतात. त्यामुळे मी या नोटीस घाबरत नाही. मी माझ्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.