मुंबई : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने, त्यांची मंत्रिपदाची जागा रिक्त झाली. त्या जागेवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची नियुक्ती केली. पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.
नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट हे राज्य मंत्रिमंडळात होते. गिरीश बापट यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन प्रशासन खाते, संसदीय कामकाज मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्रिपदही बापटांकडेच होते. आता गिरीश बापट पुण्यातून खासदार झाल्याने, त्यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्याकडी जळगावचे पालकमंत्रिपद काढून घेण्यात आले असून, आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जळगावचे पालकमंत्री असतील. नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडेच आहे.
याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसंदर्भातील माहितीही दिली. “शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना ज्या बँका कमी पडत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा आरबीआय आणि केंद्राला आहे. मात्र, आम्ही कडक शब्दात त्यांना समज दिली आहे. तरीही जर बँकांनी सहकार्य केले नाही, तर आम्ही इतर माध्यमातून त्यांच्यावर दबाव तयार करु.”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिला. तसेच, आम्ही 12 हजार शेती शाळांचे आयोजन आम्ही करणार आहोत, त्यातून शेतकऱ्यांना मदत करता येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.